– वाहतूक सुरळीकरणासह प्रवाशांना देतात माहिती
नागपूर :- तसे तर ते आहेत वाहतूक पोलिस. वाहतूक सुरळीत करणे त्यांचे काम आहे. मात्र, भरकटलेल्या प्रवाशांसाठी ते दिशादर्शक बनले आहेत. प्रवाशांनी विचारलेली प्रत्येक माहिती अचूक ते सांगतात. दिवसभर हाच कार्यक्रम चालतो. वाहतूक पोलिस चालते-फिरते माहिती केंद्र आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
रेल्वे म्हणजे अद्भुत विश्व. रेल्वेगाड्यांची धडधड, कुलींची लगबग, विक्रेत्यांची आगळीवेगळी ओरड, उद्घोषणा प्रणाली आणि प्रवाशांच्या वर्दळीत नवखा व्यक्ती हरवून जातो. त्याला तिकीट घर, पोलिस ठाणे, प्लॅटफॉर्म तिकीट घर, उपस्टेशन व्यवस्थापक, प्रवेशद्वार, प्लॅटफार्मविषयी माहिती नसते. त्यामुळे तो व्यक्ती गोंधळतो. माहिती कुठे विचारावी हेदेखील त्यांना माहिती नसते. त्यांच्या नजरेसमोर दिसतात वाहतूक पोलिस. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापेक्षा पोलिसांवर विश्वास ठेवल्यास कधीही चांगले. या भावनेतून गोंधळलेले प्रवासी वाहतूक पोलिसांना माहिती विचारतात. विशेष म्हणजे तेदेखील प्रवाशांनी विचारलेली प्रत्येक माहिती सांगतात.
नागपूर रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिस ठाणे आहे. येथील वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांवर आहे. वाहतूक विभागात संदीप तुमडाम, प्रशांत पाटील, महावीर टेंभुर्णे, सूरज जाधव, नीतेश कुरील आणि राकेश तिडके हे सहा कर्मचारी नेमले आहेत. पूर्व आणि पश्चिम या दोन भागांतील वाहतूक सुरळीत करण्याचे काम हे पोलिस करतात. दोन्ही भागांत प्रचंड वाहतूक आहे. वाहतूक सुरळीत करीत असताना दरदहा मिनिटाला एक-दोन व्यक्ती माहिती विचारण्यासाठी येतात. रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र कुठे आहे, हा प्रश्न कॉमन झाला आहे. कारण बहुतांश लोक लोहमार्ग पोलिस ठाण्याला तिकीट केंद्र समजतात. याशिवाय काही लोकांना तिकिटे रद्द करायची असते. गाडीला उशीर असल्यास त्याच तिकीटावर दुसर्या गाडीत बसण्याच्या परवानगीसाठी कुठे जायचे, अशी माहितीही विचारली जाते. प्रवेशद्वार कुठे आहे. प्लॅटफॉर्म तिकीट कुठे मिळते, या प्रश्नांची उत्तरेही वाहतूक पोलिस देतात. याशिवाय गुन्हेगारांवर लक्ष ठेवून अल्पवयीन मुलांना असामाजिक तत्त्वांच्या हाती लागण्यापासून वाचविले जाते. लोहमार्ग पोलिसांचे वाहतूक पोलिस चलते-फिरते माहिती केंद्र झाले आहेत.