मुंबई :- आदिवासींनी तयार केलेल्या विविध वस्तू,स्थानिक संस्कृती व पर्यटनाची माहिती पर्यटकांना व्हावी, याकरिता पर्यटन विभागातर्फे शनिवार दि. २६ नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे ‘लोककला महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते व पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख हस्ते होणार आहे.
वनवासी कल्याण आश्रम या स्वयंसेवी संस्थेतर्फे जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये स्थानिक आदिवासींच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आदिवासींनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील आदिवासींच्या योगदानावर आधारित प्रदर्शनी हे या पर्यटन महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
खासदार राजेंद्र गावीत, आमदार सुनिल भुसारा, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय,आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आयुष सिंह,पर्यटन संचालक बी.जी.पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे.
महाराष्ट्रात पर्यटनाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. मात्र, अनेकदा त्याची माहिती सामान्य पर्यटकांपर्यंत पोहोचू शकत नाही. महाराष्ट्राचा निसर्ग, स्थानिक लोककला व संस्कृती, स्थानिक उत्पादने, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाकडून येत्या वर्षभरात विविध जिल्ह्यांत एकूण १२ पर्यटन महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे.