- कार्यक्रमाचे केबल नेटवर्कवर लाईव्ह प्रक्षेपण
- फेसबुक व युटयुबवरही लाईव्ह प्रक्षेपण करणार
- बैठक व्यवस्था मर्यादीत ; फक्त निमंत्रितांना प्रवेश
- ध्वजारोहण सकाळी 9.15 वाजता
नागपूर,दि. 25 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिवसानिमित्त ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर होणारा ध्वजारोहण कार्यक्रम मर्यादित स्वरूपात होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. सकाळी 9.15 वाजता राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत ध्वजारोहण करणार असून हा संपूर्ण कार्यक्रम स्थानिक केबल नेटवर्कवर तसेच फेसबुक व युट्युबवर लाइव्ह करण्यात येणार आहे.
दरवर्षी, सामान्य नागरिक मोठ्या संख्येने याठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला येत असतात. विविध विभागाचे चित्ररथ व पथसंचलन या कार्यक्रमाचे आकर्षण असते. जिल्ह्यातील प्रगतीचा व उपलब्धीचा आढावा पालकमंत्री आपल्या भाषणातून सादर करीत असतात. मात्र राज्य शासनाने या संदर्भात विशेष आदेश काढून कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी यावर्षी कार्यक्रमाचे स्वरूप मर्यादित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 26 जानेवारीच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला फक्त निमंत्रितांनी उपस्थित रहावे, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे. सकाळी 9.15 वाजता ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण व मानवंदना होईल. त्यानंतर पोलीस बॅंडच्या तालावर राष्ट्रगीत तसेच 9.20 वाजता भारताच्या संविधानातील उद्देशिकाचे वाचन होईल. सकाळी 9.20 मिनिटांनी पालकमंत्री मार्गदर्शन करतील. त्यानंतर पुरस्कार वितरण केले जाईल.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना पाळण्याबाबत दक्षता घ्यावी. या ठिकाणी विनामास्क कोणालाही प्रवेश नाही. तसेच बैठक व्यवस्थाही विशिष्ट अंतराने करण्यात आली आहे. निमंत्रिताशिवाय कोणीही याठिकाणी गर्दी करू नये, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.
मात्र महत्त्वपूर्ण या राष्ट्रीय कार्यक्रमापासून नागरिक वंचित राहू नये, यासाठी नागपूर जिल्ह्यातील सर्व केबल नेटवर्कवर तसेच Facebook Live : https://fb.me/e/9Dr826ztK व YouTube Live : https://youtu.be/mv1YYCfaoz4 वर जिल्हा प्रशासनामार्फत हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह दाखविण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने एक प्रसिद्धीपत्रक काढत जिल्ह्यातील सर्व ध्वजारोहण कार्यक्रमांमध्ये सर्व व्यक्तीने राष्ट्रीय पोशाख परिधान करावा, कोरोना विषयक पार्श्वभूमी लक्षात घेता सामाजिक अंतर व कोविड संदर्भातील सर्व नियम पाळून प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्याचे आवाहन केले आहे. प्रभातफेऱ्या काढण्यात येऊ नये. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. राष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कागदाच्या व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये यासाठी प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहनही केले आहे.