संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आगामी होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी आज 13 ऑक्टोबर 2022 ला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील अशी माहिती तहसीलदार अक्षय पोयाम व निवडणूक विभागाचे सत्यजित चन्द्रीकापुरे यांनी दिली.
कामठी विधानसभा मतदार संघाच्या 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानुसार आज 13 ऑक्टोबर ला प्रारूपच्या स्वरूपात मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 21 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्यामध्ये नविन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा किंवा पत्त्यामध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कारवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही कारण विधानसभेच्या संबंधित तारखेला अस्तित्वात असलेल्या याद्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आहे तशा वापरल्या जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकाकडून होणाऱ्या चुका,मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागनिहाय यादीत नाव नसणे आदी संदर्भातील दुरुस्त्या करण्यात येतात याची नोंद घ्यावी.