नवीन कौशल्य अभ्यासक्रम सुचविण्याच्या स्पर्धेत सहभागी व्हावे – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

· आयटीआय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

· उद्योगांमधील बदलत्या तंत्रज्ञानावर होणार अभ्यासक्रम निश्चित

मुंबई :- गेल्या काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून अधिकाधिक विद्यार्थी कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन रोजगार किंवा स्वयंरोजगार करीत आहेत. आता उद्योगांमधील बदलते नवनवे तंत्रज्ञान आणि त्याअनुषंगाने आयटीआयच्या अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने पुढाकार घेतला असून यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत `सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम` ही राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत आगळ्या वेगळ्या संकल्पना सुचविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहेत, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

आयटीआयमधील विविध व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अल्प मुदतीचे नवीन कौशल्य अभ्यासक्रम सुरु केल्यास संबंधित व्यवसायांमधील अत्याधुनिक व अद्ययावत कौशल्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांना प्राप्त होणार आहे. शासकीय व खासगी आयटीआयमध्ये सध्या विविध प्रकारचे ४० अभ्यासक्रम शिकविले जातात. यावर्षी सर्व शासकीय आयटीआयमधील सर्वच ट्रेडचे प्रवेश झाले आहेत. औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात वेगाने बदल होत असल्याच्या काळात विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्य आत्मसात करणे गरजेचे बनले आहे. हे लक्षात घेऊन आयटीआयमध्ये अल्प मुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून स्वत: अभ्यासक्रम निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.

येत्या काळात आयटीआयचे स्वरूप अधिक रोजगाराभिमुख करायचा मानस आहे. त्यासाठीचा हा एक प्रयत्न असून प्रशिक्षणार्थींना आवश्यक असलेल्या अल्प मुदतीच्या अत्याधुनिक व अद्ययावत कौशल्य अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण मूळ तालुक्यात अथवा जिल्ह्यात उपलब्ध होईल व प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षणासाठी अन्य तालुका अथवा जिल्ह्यांमध्ये होणारे स्थलांतरही टाळता येईल, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

कशी असणार स्पर्धा ?

अधिक माहितीसाठी आणि स्पर्धेत सहभागासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक आयटीआयमध्ये संपर्क साधावा. स्पर्धेत विद्यार्थ्यांना शेती, स्वयंरोजगार, महिलांचे रोजगार, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम व अन्य उपयुक्त अभ्यासक्रम सुचवता येणार आहेत. ते विषय कसे उपयुक्त आहेत हेदेखील सांगायचे आहे. सुचविलेले अभ्यासक्रम राष्ट्रीय कौशल्य योग्यता फ्रेमवर्कशी (एनएसक्यूएफ) संलग्न असावेत. सर्वोत्कृष्ट विषयानुसार विद्यार्थ्याची निवड केली जाईल. त्यासाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नियुक्त केली आहे. सर्वोत्कृष्ट संकल्पना सुचविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार असून त्यांनी सुचविलेल्या अभ्यासक्रमांचा विचार केला जाणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विकास योजना आणि प्रकल्पांची माहिती मुख्यमंत्री डॅशबोर्डद्वारे मिळणार - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Thu Nov 3 , 2022
मुंबई :- राज्य शासनाच्या महत्वाच्या विकास योजना आणि महत्वाच्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती नेमकी काय आहे, त्यात काय अडचणी आहेत याची माहिती मुख्यमंत्री (सीएम) डॅशबोर्डद्वारे तत्काळ मिळणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुख्यमंत्री डॅशबोर्डची रचना वापरकर्त्यांसाठी सुलभ आणि सहज असण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रुममध्ये मुख्यमंत्री डॅशबोर्डसंदर्भात सादरीकरण आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com