-दहा फुट उंचीची सुरक्षा भींत
-भींतीवर वर्तुळाकार तारेचे कुंपण
-विशेष शाखेच्या सूचना
नागपूर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाची सुरक्षा कडेकोड करण्यात येत आहे. शहर पोलिस विशेष शाखेच्या सुचनेवरून देवगिरी बंगल्याच्या चारही बाजुंनी दहा फुट उंचीची सुरक्षा भींत, त्यावर वर्तुळाकार तारेचे कुंपण बांधण्यात येत आहे. मुख्यमंत्री निवासस्थान रामगिरी बंगल्याप्रमाणे येथील सुरक्षा भींत असणार आहे.
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून होणार आहे. त्यापृष्ठभूमीवर उपराजधानीत शासकीय निवासस्थानांची रंगरंगोटी आणि नवीनीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्याचाचा एक भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवास स्थान असलेला देवगिरी बंगला सुसज्ज करण्यात येत आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने विशेष शाखेने भींतीची उंची वाढविण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. त्यानुसार सुरक्षा भींतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. सुरक्षा भींतीवर वर्तुळाकार तारेचे कुंपण असणार आहे. आधी ही भींत केवळ चार फुट उंचीची होती.
देवगिरी बंगला म्हणजे एखाद्या राजवाड्यासारखा आहे. त्यामुळे नवीनीकरण आणि विस्तार करताना तसाच लुक राहील याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. 16 बाय 20 फुट परिसरात कार्यालयाचे नवीनीकरण होत आहे. या कार्यालयात गृहमंत्रालयातील अधिकारी, स्वीय सहायकांची व्यवस्था करण्यात येईल. तसेच जुन्या किचनचा विस्तार करून अत्याधुनिक करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंता प्रयत्नशील आहेत.
…चौकट…
पत्रकार परिषदेसाठी सुसज्ज हॉल
देवगिरी बंगल्यात पत्रकार परिषदेसाठी सुसज्ज हॉलचे बांधकाम करण्यात येत आहे. 40 बाय 80 फुटाच्या सभागृहात एकाच वेळी 300 लोक बसू शकतील या दृष्टीकोणातून बांधकाम सुरू आहे. हॉलमध्ये आरामदायक खुर्च्या असतील.
… चौकट…
अधिवेशनापूर्वी देवगिरी सज्ज
देवगिरी बंगल्याच्या सभोवताल सुरक्षा भिंत आणि त्यावर वर्तुळाकार तारेचे कुंपण राहील. दोन प्रवेशव्दारासह इतरही कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. हिवाळी अधिवेशनच्या आठवडाभरा पूर्वी कामे पूर्ण होतील. असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांनी व्यक्त केला.
@ फाईल फोटो