– दोन दिवसात सांघिक खेळात ९६ पैकी ८० सामने झाले
– भेट देऊन पोलीस आयुक्तांनी केले खेळाडूंचे कौतुक
नागपूर :- आदिवासी विकास विभागाचे तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलन पोलीस लाईन टाकळी येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शुक्रवार,३ जानेवारीपासून सुरू झाले. या स्पर्धांमध्ये अनेक अटीतटीचे सामने पाहायला मिळाले.दुसऱ्या दिवशी शनिवारला सायंकाळी ६ वाजता खेळ संपेपर्यंत १४,,१७,१९ वर्षे वयोगटातील सांघिक खेळात कबड्डी ,खो-खो ,व्हॉलीबॉल व हँडबॉल या खेळातील एकूण ९६ सामन्यापैकी ८० सामने झालेत. १६ सामने शिल्लक आहेत.
या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नागपूर, नाशिक, ठाणे व अमरावती या चार विभागातील ३० प्रकल्पातील १४, १७ व १९ वर्षे वयोगटात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल ,रिले या सांघिक खेळासह लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक ,भालाफेक , धावणे आदी वैयक्तिक खेळ सुरू आहेत.
सांघिक खेळात कबड्डी मध्ये १४ वर्षे व १७ वर्षे वयोगटात मुला, मुलींचे १६ पैकी १६ सामने झालेत. १९ वर्षे वयोगटात ८ पैकी ६ सामने झाले. असे एकूण २४ पैकी २२ सामने झालेत.१४ वर्ष कबड्डीत मुलांमध्ये ठाणे तर मुलींमध्ये अमरावती विभाग संघाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. १७ वर्ष मुले अमरावती व मुलींमध्ये सुद्धा अमरावती विभाग संघाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
खो-खो मध्ये १४ वर्षे वयोगटात ८ सामने ,१७ वर्षे वयोगटात ६ तर १९ वर्षे वयोगटात ६ सामने झालेत. खो-खो मध्ये एकूण २४ पैकी २० सामने झालेत. १४ वर्षे मुले व मुलीच्या खो-खो मध्ये नाशिक विभाग संघाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
हॉलीबॉलचे २४ पैकी १९ सामने झालेत. १४ वर्ष वयोगटात मुलांच्या हॉलीबॉल मध्ये नागपूर विभाग संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.
हँडबॉलच्या २४ सामन्यांपैकी १९ सामने झालेत.१९ वर्ष मुलांच्या हँडबॉलमध्ये ठाणे विभाग संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.
वैयक्तिक खेळातही अनेक खेळाडूंने चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या निमित्ताने आश्रमशाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्य व नैपुण्य प्रदर्शित करून राज्यस्तरावर नावलौकिक करण्याची संधी मिळालेली आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल (भापोसे) यांनी दुसऱ्या दिवशी सायंकाळी या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाला भेट देऊन आदिवासी खेळाडूंचे कौतुक केले. यावेळी अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, उप आयुक्त डिगांबर चव्हाण, उप संचालन दशरथ कुळमेथे आदींसह मान्यवर उपस्थित होते. नागपूर विभागातील शासकीय आश्रम शाळेत राबविल्या जात असलेल्या ब्रायटर माईंड उपक्रमाचे सादरीकरण तसेच गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी मलखांब कौशल्याचे सादरीकरण करून दाखविले व मान्यवरांसह उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.