– अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या इंजिनमुळे मालवाहतुकीला गती
– महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांचा विश्वास
नागपूर :-12 हजार अश्वशक्ती असलेल्या इलेक्ट्रिक इंजिनला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केला. अल्स्टॉम कंपनीने बिहारच्या मधेपुरा येथे आतापर्यंत 299 इंजिन तयार करून भारतीय रेल्वेला सुपूर्द केले. आज बुधवारी तीनशेंवा इंजिन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला सोपविला. अजनीच्या इंजिन देखभाल दुरूस्ती केंद्रात आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे, नरेशपाल सिंग, विभागीय रेल्वे अधिकारी तसेच अल्स्टॉमचे अधिकारी उपस्थित होते.
प्रसार माध्यमांशी बोलताना महाव्यवस्थापक लालावानी म्हणाले अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सज्ज असलेल्या इंजिनमुळे मालवाहतुकीला गती मिळेल. अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल आणि वेळेची बचत होईल, असा विश्वास व्यक्त केला. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर प्रकल्प देशात सुरू आहेत. मात्र, ही संकल्पना रेल्वेत फारच कमी आहे. भोपाळ येथे असा प्रकल्प सुरू आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे नंतरच कळेल. पीपीपी तत्वावरील प्रकल्प केवळ पैसे गोळा करण्याचे माध्यम नाही. तर अशा प्रकल्पांमुळे नवनवीन बदल घडतात, नवीन तंत्रज्ञात येते. ही अभिमानाची बाब आहे
अल्स्टॉमचा हा दुरूस्ती केंद्र अत्याधुनिक आणि सुसज्ज आहे. रेल्वेत असे डेपो नसतात. मात्र, यावरून रेल्वेला अनेक बाबी शिकता येतील. भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत 3 हजार मिलीयन टन माल वाहतुकीचे लक्ष ठेवले आहे. कठीन असले तरी अशक्य नाही, असेही ते म्हणाले.
या प्रसंगी बोलताना अल्स्टॉम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ऑलिव्हियर लॉईसन म्हणाले, या लोकोमोटिव्हची क्षमता सिद्ध झाली आहे. त्याच्या क्षमतेसह अधिक भार जलद गतीने उचलण्याची क्षमता आहे. 300 वी लोको डिलिव्हरी आमच्यासाठी एक अभिमानास्पद महत्वपूर्ण घटना आहे आणि आम्ही अधिक लोकोमोटिव्ह वितरित करत राहिल्यामुळे ही भागीदारी देशाच्या लॉजिस्टिक क्षमतांना चालना देत राहील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अजनी येथील इंजिन देखभाल दुरुस्ती केंद्राचा शुभारंभ 22 डिसेंबरला 2022 ला झाला. भारतीय रेल्वेच्या इतिहासात डब्ल्युएजी-12 हे इंजिन सर्वात शक्तिशाली आहे. इंजिन स्वदेशी बनावटीच्या इंजिनमुळे अत्याधुनिक क्रांती झाली आहे. या इंजिनची क्षमता सामान्य इंजिनपेक्षा दुप्पट आहे. इंजिनच्या केबिनमध्ये एअर कंडिशनिंग आणि रेकॉर्डिंग सिस्टमची व्यवस्था. 15 टक्के विजेची बचत, ब्रेक लावताच त्यातून वीज निर्मिती. ताशी 120 किमी वेगाने धावण्याची क्षमता. सहा हजार टन वजनाच्या मालाची वाहतूकीची क्षमता आहे.