– रेल्वे स्थानकावरील धक्कादायक प्रकार
– नंदीग्रामहून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
– तीन दिवस पोलिस कोठडी
नागपूर :- एमएस्सीच्या प्रथम वर्षाला शिकणार्या विद्यार्थीनीशी आक्षेपार्ह वर्तन करून ठार मारण्याची धमकी देणार्या आरोपीच्या लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या. नंदीग्राम येथून त्याला अटक करण्यात आली. मो. हजायफा (32) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. हा धक्कादायक प्रकार नागपूर रेल्वेस्थानकावर घडला.
मो. हजायफा हा पोलिस अभिलेखावर आहे. त्याच्या विरूध्द लकडगंज पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद आहे. त्याला पत्नी आणि दोन मुल आहेत. नागपुरात राहात असताना त्याने गुन्हा केला होता. त्यानंतर नागपूर सोडले आणि नंदीग्रामला राहायला गेला. तो तारखेवर येत नसल्याने त्याच्या नावे पकड वारंज जारी करण्यात आला. 22 फेब्रुवारीला तो न्यायालयात हजर झाला. न्यायालयाचे काम आटोपून रेल्वे स्थानकावर आला होता. त्याच वेळी त्याच्या डोक्यात वासनेचा सैतान जागृत झाला.
पीडित तरूणी नागपूरची असून एमएस्ससीच्या प्रथम वर्षाला शिकते. मैत्रीणीला महत्वाचे कागदपत्र देण्यासाठी ती सायंकाळच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर आली होती. मैत्रीनीची गाडी सुटण्यापूर्वी तिला कागदपत्र दिले आणि घराकडे निघत असतानाच फलाट क्रमांक चारवर आरोपीने तिला आवाज दिला. तुझ्या वडिलांना तक्रार मागे घेण्यास सांग, अशी धमकी देत सोबत पोलिस ठाण्यात चलण्यासाठी बळजबरी केली. भयभीत झालेल्या सीमाला काहीच सुचेनासे झाले. ती त्याच्या मागे मागे गेली. मुंबई लाईनच्या अंतिम टोकाकडे गेला. यार्ड परिसरातील एका एसीच्या डब्यात तिला नेले. तिच्याशी आक्षेपार्ह वर्तण करून विनयभंग केला. तसेच तिच्या मोबाईलमधून 4 हजार रुपये स्वतच्या खात्यात ट्रान्सफर केले. ती आरडा ओरड करणार त्यापुर्वीच तिला धमकी दिली. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देवून पुन्हा तिला फलाट क्रमांक चारवर सोडून दिले आणि निघून गेला.
हिंमत मिळताच गाठले पोलिस ठाणे
दरम्यान भयभीत झालेल्या सीमाने घरी किंवा मैत्रीणीला काहीच सांगितले नाही. मात्र, तिच्या वागण्यावरून काहीतरी विपरीत घडले असावे असा अंदाज कुटुंबीयांना लावला. हिंमत मिळताच तिने लोहमार्ग पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांना सारा प्रकार सांगितला. पोलिसांनी चौकशी केल्यावर सारा प्रकार स्पष्ट झाला. काशीद यांनी आरोपीच्या शोधासाठी एक पथक तयार केले. या पथकात एपीआय कविकांत चौधरी, प्रवीण खवसे, संजय पटले, अमोल हिंगणे, सतीश बुरडे, पुष्पराज मिश्रा यांनी आरोपीचे छायाचित्र मिळविले. तांत्रिक तपास करून त्याचे लोकेशन घेतले. नंदीग्रामला जावून त्याला नागपुरात आणले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.