वायु प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने मनपाचे पाऊल
चंद्रपूर :- शहरांमधील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) दिवसेंदिवस खालावत चालला आहे त्यामुळे वाढते वायु प्रदूषणास रोखण्यासाठी मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे पाऊले उचलली जात असुन यापुढेत बांधकाम साहीत्य रस्त्यावर टाकणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे.
वायु आणि विविध प्रकारचे प्रदूषण यामुळे श्वसनासंबंधी व इतर आजार उद्भवतात. यास कारणीभुत घटकांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने मा.उच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत. यात शहरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरु असतात, ही बांधकामे सुरु असतांना त्यात वापरण्यात येणाऱ्या विटा, रेती, सिमेंट, गिट्टी, व इतर साहित्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास व पर्यायाने वायू प्रदूषण होत असल्याचे दिसून येते. वास्तवीक कोणत्याही इमारतीचे बांधकाम सुरु असतांना सदर स्थळाच्या चारही बाजूस खालच्या भागापासून ते बांधकामाच्या उंचीपर्यंत ग्रीन नेटचा वापर करणे आवश्यक आहे. ज्यायोगे बांधकाम साहित्यामुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास इतरांना होणार नाही.यापुढे अश्या बांधकामांवर सक्त कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे डेब्रिजची वाहतुक न करता त्याच ठिकाणी विल्हेवाट लावण्याच्या सूचनाही देण्यात येत आहेत.
भारत सरकार अधिसूचना क्रमांक जी.एस.आर. 682(ई), दि. 05/10/1999 अन्वये 125 डेसिबल (एआय) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणा-या फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात आणि हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहेत.त्यामुळे शक्यतो हरित दिवाळीच साजरी करावी,फटाके फोडायचे असल्यास सायंकाळी ७ ते १० दरम्यानच फोडण्यात यावे.
त्याचप्रमाणे बंदी असलेल्या प्लास्टीकचा वापर करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. धुळीचे प्रमाण कमी करण्यास स्वच्छतेवर भर देऊन धुळ उडु नये याकरीता पाणी शिडकले जर आहे. बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने पूर्णपणे झाकलेली नसणे, राडारोडा वाहून नेणारी वाहने स्वच्छ नसणे, बांधकामाच्या ठिकाणीही मोठय़ा प्रमाणात स्वच्छता नसणे इत्यादींचे पालन झाले नाही तर मनपा पथकांद्वारे सक्त कारवाई करण्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.