नवी दिल्ली :- दिल्ली ते पुणे सायकल मोहिमेच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात शनिवारी आर. के. पुरम येथून नॅशनल वॉर मेमोरियलपर्यंतच्या आनंद यात्रेने (Joy Ride) झाली.
या उपक्रमात भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस तसेच दिल्ली वाहतूक पोलिसांच्या सायकलिंग संघांनी सहभाग घेतला. या सायकल रॅलीचे आयोजन ‘हिंद अयान’ या संस्थेने केले. या संस्थेचे सहसंस्थापक विष्णूदास चापके हे ही ज्या सायकल रॅलीत सहभागी होते.
यावर्षीच्या उपक्रमाचे वेगळेपण अधोरेखित करताना सांगितले की, विविध संरक्षण व निमलष्करी दलांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर सहभाग ही एक अभूतपूर्व गोष्ट आहे. “युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आणि गृह मंत्रालयाच्या मदतीने आम्ही या वार्षिक सायकल यात्रेला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासारखे सायकल परेड म्हणून विकसित करू इच्छितो,” असे मोहिमेचे आयोजक चापके यांनी सांगितले.
चापके, जे जगाला भूमीमार्गाने प्रदक्षिणा करणारे पहिले आणि एकमेव भारतीय म्हणून ओळखले जातात, त्यांनी सांगितले की या उपक्रमासाठी सुरुवातीला ५५० सायकलस्वारांनी नोंदणी केली होती, ज्यात लष्करी कर्मचारी आणि नागरिक दोघांचाही समावेश होता. मात्र, दिल्ली विधानसभेच्या निवडणूक निकालांनंतर स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांच्या नोंदण्या रद्द करण्यात आल्या आणि लष्करी प्रतिनिधित्व कमी करण्यात आले.
दिल्ली ते पुणे सायकल मोहिमेचा उद्देश सायकलिंगला एक शाश्वत व आरोग्यदायी वाहतूक साधन म्हणून प्रोत्साहन देणे असून, पंतप्रधानांच्या फिट इंडिया मिशनशी हे सुसंगत आहे. आयोजकांनी क्रीडामंत्री मनसुख मांडविया आणि क्रीडा सचिवांचे त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी आभार मानले.
मोहिमेच्या यशासाठी, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे सचिव यांनी दिल्ली एनसीआर चे मुख्य सचिव यांना वैयक्तिकरित्या संपर्क साधून आवश्यक लॉजिस्टिक मदत व सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची विनंती केली. यामुळे सहभागी सायकलस्वारांना कर्तव्य पथावर सायकल चालवण्याची तसेच दिल्ली ते आग्रा यमुना एक्सप्रेसवेवरून प्रवास करण्याची परवानगी मिळाली.
याशिवाय, क्रीडामंत्र्यांच्या संडे ऑन सायकल उपक्रमाला प्रतिसाद म्हणून दिल्ली ते आग्रा पर्यंतची विशेष सायकल यात्रा आयोजित करण्यात आली आहे, ज्यात लष्करी आणि नागरी सायकलस्वारांचा संयुक्त सहभाग असेल. ही मोहिम फिटनेस, पर्यावरणीय शाश्वतता आणि विविध संस्थांमधील सहकार्य यावरचा वाढता भर अधोरेखित करते, तसेच फिट इंडिया मिशन अंतर्गत व्यापक राष्ट्रीय उद्दिष्टांचे प्रतिबिंब ही आहे.