मुंबई :- ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील आरोपी विशाल गवळीवर विनयभंगाचे व इतर असे एकूण नऊ गुन्हे कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये आरोपी विशाल गवळी व अन्य पाच ते सहा गुन्हेगारांनी मानसिक रुग्ण असल्याच्या प्रमाणपत्राआधारे विनयभंग, छेडछाड अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये जामीन मिळविल्याचे आढळून आलेले नाही. तसेच या प्रकरणी पोलीस विभागाने हलगर्जीपणा केलेला नाही. त्यामुळे त्याबाबतची चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य शशिकांत शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. सदस्य ॲड. अनिल परब यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.
गृहराज्यमंत्री कदम म्हणाले, विशाल गवळीवर एकूण नऊ गुन्हे दाखल असून त्यातील आठ गुन्ह्यांमध्ये जामीन प्राप्त झालेला आहे. तर, एका गुन्ह्यामध्ये विशाल गवळी सध्या अटकेत आहे. त्यास मानसिक रुग्ण म्हणून जामीन मिळालेला नाही. विशाल गवळीला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नसून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याच्यावर एमपीआयडी सारखा गुन्हा दाखल करता येईल का, हे देखील तपासून पाहिले जाईल, असेही कदम यांनी सांगितले.