यवतमाळ :- खरीप हंगाम २०२४ ला सुरुवात होत आहे. खरीपात शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाणे व खते खरेदी करतात. सद्या जिल्ह्यामध्ये रासायनिक खताच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याबाबत मोठ्या प्रमाणात विविध माध्यमाद्वारे अफवा पसरत आहे, या अफवा निराधार असून खताच्या किमतीमध्ये वाढ झालेली नाही.
रासायनिक खताच्या दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताच्या बॅगवरील एमआरपी पाहूनच परवानाधारक कृषी केंद्रातून पक्क्या बिलाद्वारे खतांची खरेदी करावी. कोणत्याही खत विक्रेत्याकडून एमआरपी दरापेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयाकडे रितसर तक्रार नोंदवावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी कळविले आहे.