– कर्तव्यपूर्ती सोहळ्यात विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सन्मान
अमरावती :- सेवानिवृत्त होत असतांना कर्मचा-यांनी दिलेल्या सेवेच्या कर्तव्यपूर्तीचा त्यांना मोठा आनंद असतो व विद्यापीठालाही त्यांचा अभिमान आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले. शनिवारी दि. 29 एप्रिल, 2023 रोजी विद्यापीठातील वित्त विभागातील कर्मचारी आर.डी. हटवार व आय.क्यू.ए.सी. विभागातील आर.डी. कोकाटे यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य डॉ. वैशाली गुडधे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, आय.क्यू.ए.सी. विभागाचे संचालक डॉ. संदीप वाघुळे, सत्कारमूर्ती राजेंद्र हटवार, राजाराम कोकाटे यांची उपस्थिती होती.
कुलसचिव डॉ. तुषार देशमुख पुढे म्हणाले, विद्यापीठातील कर्मचारी सेवानिवृत्त होत असतांना दुसरीकडे मनुष्यबळाची पोकळी देखील निर्माण होत आहे. ही पोकळी भरुन काढण्यासाठी प्रशासनाकडून शासनाकडे पाठपुरावा सुध्दा केला जात आहे. 72 जागांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्यातील पन्नास टक्के जागा जरी शासनाने मंजूर केल्यात, तर विद्यापीठातील सेवा सुरळीत होईल. सत्कारमूर्तींची कामाप्रती नेहमीच तळमळ राहिलेली आहे व विद्यापीठाला सुध्दा त्यांचा अभिमान आहे, असे सांगून हटवार व कोकाटे यांना त्यांनी पुढील आयुष्याच्या शुभकामना दिल्या.
सत्कारमूर्ती राजेंद्र हटवार मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, तीस वर्षे दोन महिने विद्यापीठाला सेवा दिली. संगणकीय प्रणाली सुरू झाल्यावर कामे अगदी वेगाने पार पाडली गेली. एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीने डॉलरने शुल्काचा भरणा केला होता, तो प्रसंग सांगतांना बँकेत जेव्हा डॉलर जमा करावयास गेलो तेव्हा बँकेने परकिय चलन घेण्यास नकार दिल्याने अडचण निर्माण झाली होती. मग त्यातून बँकेने मार्ग सूचवला व नागपूर येथे जावून भारतीय स्टेट बँकेत डॉलर जमा करुन नंतर ते भारतीय चलनात परिवर्तीत केले असे हटवार यांनी सांगितले. राजाराम कोकाटे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, प्रदिर्घ सेवा झालेली आहे व यादरम्यान आपल्याला सर्वांनी नेहमीच सहकार्य केले त्यांचा मी आभारी आहे. प्रमुख अतिथी डॉ. वैशाली गुडधे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, आ.क्यू.ए.सी. विभागाचे संचालक डॉ. संदीप वाघुळे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
सत्कारमूर्ती राजेंद्र हटवार व राजाराम कोकाटे यांचा कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी शाल, श्रीफळ, गौरव प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. तर हटवार व कोकाटे यांचा प्रज्ञा बोंडे यांचा साडीचोळी व कुंकवाचा करंडा देऊन सत्कार केला. तसेच विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष मंगेश वरखेडे व सचिव श्रीकांत तायडे यांनी सत्कारमूर्ती हटवार व कोकाटे यांना कर्मचारी कल्याण निधीचा धनादेश देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, विद्यापीठ गीताने व मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी केले. कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबियांतील सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.