यवतमाळ :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची जाहिरात समाजमाध्यमातून पसरविण्यात येत आहे. परंतू अशी कोणत्याही प्रकारची पदभरती सद्या केली जात नसून समाजमाध्यमावर दिशाभूल केली जात आहे.
मग्रारोहयोंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक व क्लर्क कम डेस्क ऑफीसर या विविध कंत्राटी पदासाठी भरती प्रक्रीया राबविण्यात येत असल्याबाबतची जाहिरात विविध समाजमाध्यमातून पसरविल्या जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवक, युवती या जिल्हा परिषदेच्या रोहयो विभागात संपर्क साधुन भरती प्रक्रीयेबाबत विचारणा करीत आहे.
जिल्हा परिषद स्तरावरुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सद्या कुठल्याही पदाची भरती प्रकीया राबविण्यात येत नाही. युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सावधगिरी बाळगावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी कळविले आहे.