मुंबई :- नांदेड जिल्ह्यातील भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यासह जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी या कामांना गती द्यावी. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आज नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील जलजीवन मिशनच्या व वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला.त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार अशोक चव्हाण (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अभिषेक कृष्णा, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 1234 कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तर 28 पाणी पुरवठा योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत राबविण्यात येत आहेत. यामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर, अर्धापूर व मुदखेड तालुक्यात 122 जिल्हा परिषदेच्या दोन योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत सुरु आहेत. ही सुरु असणारी कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी या कामांना गती द्यावी. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करावेत.