नागपूर :-नागपूर विद्यापीठात विविध प्रकारचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी वस्तीगृहात राहणाऱ्या पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना 25 डिसेंबर ते 9 जानेवारी पर्यंत वस्तीगृह रिकामे करण्याचा आदेश नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अगदी परीक्षेच्या तोंडावर दिला आहे. या तुघलकी निर्णयाचा विरोध बहुजन समाज पार्टीचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे व जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी केला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की नागपूर विद्यापीठाद्वारे 3 जानेवारी पासून 7 जानेवारी पर्यंत इंडियन सायन्स काँग्रेस चे संमेलन होत आहे. यासाठी देशभरातून येणाऱ्या 10 ते 15 हजार प्रतिनिधींच्या निवासाची सोय करायची असल्याचे कारण सांगितल्या जात आहे. त्यासाठी विद्यापीठाचे शहरातील चार वस्तीगृह ज्यात दोन मुलांचे, एक मुलींचे व एक विदेशी विद्यार्थ्यांचे ज्यामध्ये 500 पेक्षा अधिक विद्यार्थी निवास करतात. त्यांना आपल्या सामानासहित खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत.
त्यासाठी 25 डिसेंबर ते 9 जानेवारी या दरम्यान सुट्ट्या सुद्धा जाहीर केलेल्या आहेत. या कार्यक्रमासाठी शिक्षक, अंशदायी शिक्षक, कंत्राटी शिक्षक, विद्यार्थी व पीएचडी संशोधक यांना 3 हजार रुपये नोंदणी फी असल्याचे सांगितले गेले. याचाही बसपा ने निषेध केला आहे. 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेससाठी येणाऱ्या प्रतिनिधींच्या राहण्याची सोय स्वतः विद्यापीठाने स्वतंत्ररीत्या करावी.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी व निवासासाठी असलेल्या होस्टेलचा त्या प्रतिनिधीसाठी वापर करू नये. व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तोंडावर विनाकारण त्रास देऊ नये. यासाठी सामाना सहीत वस्तीगृह खाली करण्याचा हा आदेश मागे घ्यावा. अन्यथा बसपा या तुघलकी निर्णया विरुद्ध आंदोलन करेल असा इशारा बसपा नेते संदीप मेश्राम व उत्तम शेवडे यांनी दिला आहे.
@ फाईल फोटो