– मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पोहरादेवी, धामगणव देव येथे भेट व दर्शन
यवतमाळ :- जनतेचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद हेच आपले बलस्थान आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून देत जनतेने विश्वास टाकला. त्यांच्या आशीर्वादानेच चौथ्यांदा मंत्री म्हणून राज्याच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळाली, असे प्रतिपदान नवनिर्वाचित मंत्री संजय राठोड यांनी केले.
महायुती सरकारमधील नवनियुक्त मंत्री संजय राठोड यांनी सोमवारी संध्याकाळी श्री क्षेत्र पोहरागड (जि. वाशिम) व श्री क्षेत्र धामणगाव देव (ता. दारव्हा) येथे कुटुंबासह भेट देत संत श्री सेवालाल महाराज व श्री मुंगसाजी माऊलींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
दिग्रस-दारव्हा-नेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी रविवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथे संत श्री सेवालाल महाराज यांच्या दर्शनासाठी नागपूरहून आले. यावेळी त्यांच्या सहचारिणी शीतल राठोड सोबत होत्या. पोहरागड येथे संत श्री सेवालाल महाराज, माता जगदंबा देवी, संत श्री रामराव बापू महाराज यांचे दर्शन घेवून आशीर्वाद घेतले. तिन्ही ठिकाणी त्यांनी सपत्निक पूजाविधी करून प्रार्थना केली. याप्रसंगी बंजारा समाजाचे धर्मगुरू, आमदार बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जीतेंद्र महाराज, महंत शेखर महाराज, महंत यशवंत महाराज, हरिशचंद्र राठोड, शीतल राठोड शिवसेना पदाधिकारी, वाशिम जिल्ह्यातील सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते. याप्रंसगी पोहरादेवी येथील संत, महंतांच्या वतीने ना. संजय राठोड यांचा सत्कार करण्यात आला.
दारव्हा तालुक्यातील धामणगाव (देव) येथे ना. संजय राठोड यांनी श्री मुंगसाजी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेवून पूजा केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कालिंदा पवार, यशवंत पवार, तालुका प्रमुख मनोज सिंघी, मनोज नाल्हे, सभापती सुभाष राठोड, सुखदेव राठोड, पुष्पा ससाणे, सुनिता राऊत, संगीता इंगोले, उषा चव्हाण आदींसह मुख्य दरबार संस्थानचे अध्यक्ष गजानन अंबुरे, मुरली महाराज अंबुरे, राम मंदिर संस्थानचे घनश्याम राठोड, चिंच् देवस्थानचे देशमुख यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी तिन्ही संस्थानच्या वतीने संजय राठोड यांचा सत्कार करण्यात आला. दर्शनानंतर रात्री उशिरा ना. संजय राठोड नागपूर येथे रवाना झाले.