– ग्रामायण उद्यम एक्स्पोत कचऱ्यातून उद्योग साकारणाऱ्याचा सत्कार
नागपूर :- परंपरागत व्यवसाय आणि पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरांमुळे काही लोकांनी स्वच्छता व्यवसाय स्वीकारला आहे. कचरा किंवा टाकाऊ पदार्थ हे बिनकामाचे नसतात; त्यांच्या उपयोगितेची ओळख हा आपल्या दृष्टीकोनावर अवलंबून असतो. योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यास, कचऱ्याचं सोनं करता येतं. “कचऱ्यातून उद्योग साकारले पाहिजेत” असा ठाम सूर मान्यवरांच्या भाषणातून उमटला.
ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने यंदा अमृत भवन, आंध्र असोसिएशन परिसर, उत्तर अंबाझरी मार्ग, झाशी राणी चौकाजवळ १६ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान ६वे ग्रामायण उद्यम प्रदर्शन सुरु आहे. आज रविवारी (दि. 19 जानेवारी) कचऱ्यातून उद्योग साकारणाऱ्या सामाजिक संस्थाचा सत्कार करण्यात आला. इतकेच नव्हेतर नागपूर शहरातील काही निवडक रस्त्यावरून कचरा वेचणाऱ्या 50 स्वच्छतादूताना किट, सन्मान निधी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्वच्छता किटमध्ये खांद्यावर अडकवण्याची पिशवी, हॅन्डग्लोज आणि मास्क देण्यात आले असून, त्यांना कचरा वेचण्यासाठी फायदा होईल.
यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर, ग्रामायण प्रतिष्ठानचे सचिव संजय सराफ, इपीआर प्लास्टिकचे प्रमुख निशांत बिरला आणि विधान भारतीया, इ-वेस्ट कलेक्शनच्या महीमा सुरी, रोहिदास राठोड यांची मंचावर उपस्थिती होती.
टाकाऊ पदार्थ म्हणजे बिनकामाच्या वस्तू नसतात
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे म्हणाले, कचरा किंवा टाकाऊ पदार्थ म्हणजे बिनकामाच्या वस्तू नसतात; आपल्या दृष्टीकोनावर त्यांचे महत्त्व ठरते. योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यास, हे पदार्थ रॉ मटेरियल किंवा पुनर्वापरासाठी उपयुक्त ठरू शकतात. याच संकल्पनेवर आधारित यावर्षीची “रिसर्क्युलेशन इकॉनॉमी” ही थीम आहे.
स्वच्छतेचा विषय महत्त्वाचा पण दुर्लक्षित
जिल्हा परिषद, नागपूरचे समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर म्हणाले, आजचा स्वच्छतेचा विषय हा भारतात एक महत्त्वाचा पण दुर्लक्षित विषय आहे. स्वच्छता हा आपल्या समाजात अनेकदा आवश्यक तेवढा विचार किंवा लक्ष मिळवत नाही. मात्र, काही परंपरागत व्यवसायांनी किंवा पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरांमुळे काही लोकांनी स्वच्छता व्यवसाय स्वीकारला आहे. या व्यवसायाला समाजात सन्मान मिळायला हवा. आज आपण या सन्मानासाठी जो कार्यक्रम आयोजित केला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. स्वच्छता व्यवसायाशी संबंधित पालकांच्या मुलांना योग्य शिक्षण आणि संगोपन मिळावे, यासाठी शासनाने विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
समाजात परिवर्तनासाठी प्रेरणा आणि कायद्याचे ज्ञान आवश्यक
ग्रामायण प्रतिष्ठानचे सचिव संजय सराफ प्रास्ताविकात यांनी सांगितले की, जगातील अनेक लोक केवळ नोकरीसाठी कंपन्यांमध्ये किंवा कॉर्पोरेशनमध्ये काम करतात. ती नोकरी असते, परंतु त्यांची स्वतःची उद्योजकता नसते. याउलट, या प्रदर्शनाची मुख्य थीम आहे उद्योग. मग ते किरकोळ विक्रेते असोत, मालवाहतूक करणारे असोत, किंवा मोठ्या स्पर्धकांना टक्कर देणारे उद्योजक असोत. समाजात परिवर्तन घडण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रेरणा आणि कायद्याचे ज्ञान. ग्रामायण हे प्रेरणास्थान आहे, तर कायद्याच्या सहाय्याने समाजाला पुढे नेण्याचे कार्य होऊ शकते. या कार्यक्रमाचा उद्देश प्रेरणा जागवणे आणि कायद्याची माहिती पुरवणे हा आहे. कायद्याचे अस्तित्व आपल्या देशात आहेच, परंतु त्याचा योग्य उपयोग करणारी केंद्रीय व्यवस्था असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
रविवारी साटोणे यांची कचऱ्यातून कला कार्यशाळा घेण्यात आली. याशिवाय साधना फडकर, प्रतीक लांजेवार यांनी कचऱ्यातून कला वस्तू मॉडेल प्रदर्शन सादर केले. स्वच्छता क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांचा परिचय व सन्मान स्वच्छतेशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वच्छ असोसिएशन नागपूर संस्थेचे प्रमुख सुरज श्रीवास्तव, संस्कार समर्थ, अमर स्वरूप फाउंडेशन पुलक मंच परिवार संस्थेचे प्रमुख मनोज बंड, सीएफ एसडी (सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट) संस्थेच्या प्रमुख लीना बुधे, स्वच्छ असोसिएशन संस्थेच्या प्रमुख अनुसया काळे, अन्विती संस्थेच्या प्रमुख शेफाली दुधबळे, स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रमुख प्रीती जोशी, तेजस्विनी महिला मंच संस्थेच्या प्रमुख किरण मुंदडा,आरोह संस्थेच्या प्रमुख विशाखा राव यांचा सत्कार करण्यात आला.
समाज स्वच्छतेचे खरे दूत म्हणजे कचरावेचक. समाज आणि परिसर स्वच्छ व स्वस्थ ठेवण्यासाठी त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सरकार किंवा संघटनांचा पाठिंबा नसतानाही, ते स्वतःच्या कष्टाने आणि समर्पणाने हे कार्य अविरतपणे करत असतात. कचऱ्यातून टाकाऊ वस्तूंना पुनर्वापरातून मूल्य मिळवून ते आपला उदरनिर्वाह चालवतात. खऱ्या अर्थाने ते समाजाचे श्रमदूत आणि स्वच्छतेचे रक्षक आहेत. समाजाकडून फारशी दखल घेतली जात नसली, तरीही त्यांच्या कष्टातून ते स्वयंरोजगार निर्माण करतात, हे अत्यंत उल्लेखनीय आहे. या महत्वपूर्ण कार्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. स्वच्छतादूताना देण्यात आलेल्या सन्मान पत्राचे वाचन मंजुषा रागीट यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अंजली वाणी यांनी केले, तर आभार किशोर केळापुरे यांनी मानले.
सामाजिक संस्थांचा परिचय स्वच्छ असोसिएशन नागपूर संस्थेचे प्रमुख सुरज श्रीवास्तव, संस्कार समर्थ.
कचरा दिसतो त्या ठिकाणी खडूने मार्क करून संदेश लिहून जनजागृती करणे हा त्यांचा उद्देश आहे, जेणेकरून कचरा करणाऱ्याला लाज वाटेल. तसेच, प्लास्टिक वेस्टपासून इको ब्रिक्स तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचे कार्य ही संस्था करते. हेरिटेज वर्क, ट्री वर्क, क्लिनिंग ऍक्टिव्हिटी, डस्टबिन इन्स्टॉलेशन, आणि इको ब्रिक वॉल उभारणीसारख्या अनेक उपक्रमांत ही संस्था सक्रिय आहे.
अमर स्वरूप फाउंडेशन पुलक मंच परिवार संस्थेचे प्रमुख मनोज बंड.
शहरांमधून जुनी भांडी, ब्लँकेट्स, स्कूल बॅग्ज, आणि कपड्यांचे संकलन करून गडचिरोली येथील ग्रामीण विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे काम ही संस्था करते. शाळेच्या शिक्षणासाठी सायकल वाटप आणि बचत गटांकडून तयार केलेल्या साड्यांपासून पिशव्या तयार करून पॉलिथिनला पर्याय म्हणून त्या वितरित करण्याचे कार्य संस्थेद्वारे केले जाते. तसेच, वृक्षारोपणाचे महत्त्वपूर्ण कार्यही या संस्थेने हाती घेतले आहे.
सीएफ एसडी (सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट)संस्थेच्या प्रमुख लीना बुधे.
कचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण, घरगुती ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करणे, कचरा वेचकांना समान न्याय, ओळखपत्रांचे वितरण, आणि आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे या क्षेत्रांमध्ये ही संस्था काम करते. कचरा व्यवस्थापन योजनांतर्गत मटेरियल रिकवरी फॅसिलिटी संचालन आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाचे कामही ही संस्था करते.
स्वच्छ असोसिएशन संस्थेच्या प्रमुख अनुसया काळे.
ही संस्था 5 जुलै 2015 रोजी नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून नोंदणीकृत झाली. पाणी, हवा, निसर्ग, आणि जैवविविधता या पर्यावरणीय आयामांवर कार्यरत असलेली संस्था कचऱ्याचे पृथक्करण, पुनर्वापर, आणि योग्य विल्हेवाटीबाबत मार्गदर्शन करते. तसेच, ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचे प्रशिक्षण देते. महिलांच्या शारीरिक स्वच्छतेबाबत जनजागृती आणि सॅनिटरी नॅपकिन्सच्या योग्य वापरासाठी शिक्षण देण्याचे कार्यही ही संस्था करते.
अन्विती संस्थेच्या प्रमुख शेफाली दुधबळे.
नागरिकांनी सुरू केलेली ही संस्था पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती करते. परिसर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, झाडे लावणे, पाणी बचत, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आणि औषधी वनस्पतींचे वितरण अशा विविध उपक्रमांत ही संस्था सक्रिय आहे. आठवडी बाजारांमध्ये प्लास्टिक बंदी अभियान आणि ई-वेस्ट कलेक्शन ड्राइव्हही ही संस्था राबवते.
स्त्री मुक्ती संघटना संस्थेच्या प्रमुख प्रीती जोशी.
स्त्री-पुरुष समानता आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांत 1975 पासून कार्यरत असलेली संस्था वर्ध्याला 2016 पासून कचरा व्यवस्थापन आणि कचरा वेचक महिलांसाठी काम करते. शाळा, कॉलेज, आणि वसाहतींमध्ये शून्य कचरा व्यवस्थापनाची जनजागृती व कचरा वेचक महिलांसाठी बचत गट तयार करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य या संस्थेद्वारे होते.
तेजस्विनी महिला मंच संस्थेच्या प्रमुख किरण मुंदडा.
संस्कार, संस्कृती, स्वच्छता, आणि पर्यावरण या चार घटकांवर कार्य करणारी संस्था नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर टाळणे, प्लास्टिक व डिस्पोजेबल वस्तूंचा वापर कमी करणे, आणि अन्न व पाणी वाया न घालवण्यासाठी जनजागृती करते.
आरोह : संस्थेच्या प्रमुख विशाखा राव.
पर्यावरण आणि स्त्री सक्षमीकरण या क्षेत्रांत कार्यरत असलेली संस्था जुने कपडे संकलित करून त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यास मदत करते. बचत गटांना कपडे शिवण्याचे आणि वस्त्र निर्मितीचे प्रशिक्षण देते. बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू ‘रंगरेषा’ ब्रँडने विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जातात.