भावी पिढीमध्ये रुजवावे संतांचे विचार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– विश्व वारकरी सेवा संस्थेतर्फे अभिनंदन सोहळा

नागपूर :- महाराष्ट्राची संस्कृती संतांच्या वाङ्मयाशी जुळलेली आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, गजानन महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आदी संतांनी जीवन कसे जगावे, याचा संदेश दिला. सुसंस्कृत समाज निर्माण होण्यासाठी संतांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. त्यासाठी भविष्यातील पिढीमध्ये संतांचे विचार रुजविण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे. त्यातून समाज उभा होईल आणि राष्ट्रनिर्माणाचे उद्दिष्ट साध्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी (शुक्रवार, दि. ३ जानेवारी) केले.

विश्व वारकरी सेवा संस्थेच्या वतीने जुना सुभेदार ले-आऊट येथील आदर्श मंगल कार्यालयात अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. गडकरी बोलत होते. यावेळी विश्व वारकरी सेवा संस्थेचे संदीप काळे यांची उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘महासागरातील प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो. तसेच अंधःकार नाहीसा करण्यासाठी एक छोटासा दीप महत्त्वाचा असतो. सूर्याचा आणि चंद्राचा अस्त होईल, तारे लोप पावतील. सगळीकडे अंधःकार होईल. अशावेळी दीप म्हणतो की, मी जळत राहील. किती उजेड देऊ शकेन, हे माहिती नाही; पण अंधःकार दूर करण्याचा माझा प्रयत्न अखेरपर्यंत सुरू राहील.’

संतांचे विचार, त्यांनी दिलेले संस्कार भक्तीमार्गाच्या माध्यमातून भविष्याच्या पिढीपर्यंत पोहोचावेत, असा उद्देश आहे. सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी संतांचा प्रत्येक विचार अंधःकार नाहीसा करणाऱ्या तेजस्वी पणतीप्रमाणे आहे, असेही ते म्हणाले.

‘जे का रंजलें गांजले, त्यासी म्हणे जो आपुले… तोचि साधु ओळखावा, देव तेथेंचि जाणावा’. माझी आई मला नेहमी संत तुकाराम महाराजांचा हा अभंग सांगायची. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे : ‘आकाशात् पतितं तोयं, यथा गच्छति सागरम् । सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||’. ‘पडे खालती जे नभातून पाणी… जसे सागरा तेच जाते मिळोनी; नमस्कार कोणाही देवास केला… तरीं अंती तो पोचतो केशवाला’ असा या संस्कृत सुभाषिताचा मराठी अनुवाद आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणात हेच सांगितले आहे. ‘माझा धर्म किंवा परमेश्वर श्रेष्ठ आहे, हे सांगायला मी इथे आलेलो नाही. कारण तुमची ज्या धर्मावर, परमेश्वरावर श्रद्धा असेल, त्याची भक्ती करून शेवटी आपण एकाच ठिकाणावर पोहोचणार आहोत,’ असा विचार स्वामी विवेकानंदांनी मांडला, या शब्दांत ना. गडकरी यांनी संतांच्या विचारांचे महत्त्व विशद केले.

भक्तीरसाचा संस्कार समाजात निर्माण झाला तर समाजात गुणात्मक बदल होईल. आपण चांगल्या विचारांच्या सहवासात असलो तर चांगली प्रेरणा मिळते. संत गोरा कुंभार, चोखामेळा, गजानन महाराज, तुकडोजी महाराजांची आपण जात विचारत नाही. कारण माणूस त्याच्या जातीने नव्हे तर गुणांनी श्रेष्ठ असतो. त्यामुळे जे चांगले आहे ते स्वीकारण्याची भूमिका असली पाहिजे, असेही ना. गडकरी म्हणाले.

आपले आशीर्वाद होते म्हणून…

आपण आशीर्वाद दिले त्यामुळे मी निवडणुकीत विजयी झालो. दहा वर्षांत एक लाख कोटी रुपयांची कामे मी नागपुरात करू शकलो. आतापर्यंत मला दहा डॉक्टरेट मिळाल्या. कालच आणखी एका विद्यापीठाचीही डी.लिट. मिळाली. हे सारे आपण दिलेल्या पाठबळामुळेच शक्य होऊ शकले, या शब्दांत ना. गडकरी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शासनाने राष्ट्रीय महामार्गावरील निंभी, पुसला येथील टोल नाक्याची भूमिका स्पष्ट करावी !

Sat Jan 4 , 2025
– खासगी वाहने टोल मुक्त न केल्यास जनआंदोलन ऊभारण्याचा ईशारा !  मोर्शी :- नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढूर्णा राष्ट्रीय महामार्गाचे काम नीकृष्ट दर्जाचे व अपूर्ण असतांनाही वरूड मोर्शी अमरावती राष्ट्रीय महामार्गावर मोर्शी वरूड तालुक्यात निंभी येथील टोल नाका सुरू केला असून पुसला येथील टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हजारो नागरिकांचे बळी घेऊन त्यांचे संसार उध्वस्त करणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!