संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील आजनी गावात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांकडून ठिय्या मांडून गावातील लहान, मोठे हल्ला करणे, चावा घेणे, लहान मुलांना ओढत नेणे, भुंकणे यासारखे प्रकार वाढले असल्याने संपूर्ण गावात एक दहशत माजली आहे.
सध्या गावात ग्राम पंचायत निवडणूकीचे वातावरण असून उमेदवार प्रचारासाठी कंबर कसून बसलेले असताना या चावा घेणाऱ्या श्वानांचा मात्र सर्वांनीच धसका घेतला आहे. या श्वानाने मनीषा मिरासे, मयूर चव्हाळे, यांना कडकडून चावा घेतला आहे तर प्रवीण कोळमकर यांच्या मुलाला ओढत नेण्याचा प्रयत्न केला होता. लोकांच्या सतर्कतेमुळे त्यांच्या मुलाचा जीव वाचला.तसेच गुणवंता झलके यांच्या मुलासह गावातील अजून काही नागरिकांवर या भटक्या श्वानाने हल्ला केलेला आहे. शहरातील भटक्या श्वानांचा मुद्दा आज सर्वत्र गाजत असला तरी गाव खेड्यातील या श्वानांचा देखील बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आजनी गावातील नागरिक करत आहेत. ऐन बाजार चौकातच कितीतरी श्वानांच्या टोळ्या ठाण मांडून बसलेले असतात. अगदी पहाटे पासून उठून शेतीवाडीच्या कामाला जाणारे गावकरी मात्र या श्वानाच्या वाढत्या हल्ल्यांनी भयभीत झाले आहेत.