नागपूर :- स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीद्वारे मंगळवारी (ता.१२) नागपूर शहरातील स्वाईन फ्लूच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या अध्यक्षतेखाली स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची बैठक पार पडली. याप्रसंगी मनपाचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. निलीमा वानखेडे, डॉ. दिपाली वाठ, डॉ. तपन बडोले आदी उपस्थित होत.
मे २०२३ ला रुग्णालयात भरती झालेल्या एका जेष्ठ रुग्णाचा २७ जून २०२३ रोजी एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला त्यासंबंधाने समितीद्वारे चर्चा करण्यात आली. सविस्तर चर्चेअंती सदर मृत्यू हा स्वाईन फ्ल्यू व त्यानंतर निर्माण झालेल्या गुतांगुतीमुळे झाला असा निष्कर्ष काढण्यात आला. मृतक रुग्ण ७० वर्षीय महिला असून त्यांना मधुमेह व रक्तदाब या सहव्याधी होत्या. सदर रुग्णाचे निकटवर्तीयांचा शोध घेतला असता कुठलाही संसर्ग आढळून आला नाही. रुग्णाच्या रहिवासी परिसरात १०० घरांचे देखील सर्वे करण्यात आले. मात्र स्वाईन फ्लू सदृष्य कोणीही रुग्ण आढळून आले नाही.
नागपूर शहरात जानेवारी २०२३ पासून एकूण २४ स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झालेली आहे. जानेवारी महिन्यात ८ रुग्ण, फेब्रुवारी महिन्यात २ रुग्ण, मार्च महिन्यात ६ रुग्ण, एप्रिल व मे महिन्यात प्रत्येकी ४ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी जानेवारी महिन्यात १, मे महिन्यात ३ असे एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून २० रुग्ण आजारावर मात करून सुखरूप घरी पोहचले आहेत. मृत्यू झालेले रुग्ण हे जेष्ठ नागरिक आहेत. तसेच त्यांना इतरही आजार होते व त्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊन त्यांचा मृत्यू झाला. करीता नागरिकांनी फ्लू सदृश लक्षणे असल्यास शक्य तेवढ्या लवकर जवळच्या मनपा दवाखान्यात किंवा नजीकच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले आहे.
स्वाईन फ्लू पासून होणारा धोका टाळण्यासाठी ही काळजी घ्या
– हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा
– सॅनिटायजरने हात निर्जंतूक करा
– गर्दीमध्ये जाणे टाळा
– गर्दीत जाण्याची गरज पडल्यास मास्क लावूनच घराबाहेर पडा
– खोकताना व शिंकताना तोंडावर रूमाल ठेवा
– वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तू, जागांना निर्जंतूक करा
– पौष्टिक आहार घ्या
हे टाळा
– हस्तांदोलन अथवा आलिंगन
– सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
– मास्क न वापरता गर्दीत जाणे