मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न

• मराठा आरक्षणासाठी तीन मा.न्यायमूर्ती (निवृत्त) यांची समिती गठित करण्याचा निर्णय

• न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अंतरिम अहवाल उद्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारणार

मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये,मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई :- मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. निवृत्त न्यायमूर्ती श्री.भोसले, श्री.गायकवाड आणि शिंदे यांची समिती गठित करण्याचा निर्णय घेतला असून ही समिती मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आणि मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासंदर्भात मार्गदर्शन करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री दिलीप वळसे – पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित केलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या समितीचा अहवाल उद्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला जाईल.

न्या. शिंदे समितीने आतापर्यंत एक कोटी 73 लाख 70 हजार 659 नोंदी तपासल्या असून 11 हजार 530 कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. मराठवाड्यातल्या जुन्या नोंदी तपासताना ऊर्दू आणि मोडी भाषेतील कागदपत्रांचे मराठी भाषांतर करून घेण्याचे काम सुरू आहे.

मा.सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेण्यास संमती दिल्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेचे काम सुद्धा अधिक गतीने सुरू आहे. मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढाईसाठी स्थापन केलेल्या वरिष्ठ वकिलांच्या टास्क फोर्सची बैठकसुद्धा लवकरच घेण्यात येईल. मात्र, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय फेटाळताना जी निरीक्षणे नोंदविली तिचा अभ्यास मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, निवृत्त न्यायमूर्ती श्री.निरगुडे करतील.

मराठा आरक्षणावरून राज्यात जी काही आंदोलने व उपोषणे सुरू आहेत त्याकडे आम्ही अतिशय गांभीर्याने पाहत आहोत. सरकारला मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे, कायद्याला, नियमाला धरून आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे यासाठी सर्व बाजूंचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण दिले जाईल. हे आरक्षण देत असताना इतर घटकांवर अन्याय होणार नाही. यापूर्वी दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही, असे पुन्हा घडू नये यासाठी काळजीपूर्वक पावले टाकावी लागणार आहेत. यामुळे आंदोलकांनी देखील सरकारची भूमिका समजून घेत सहकार्य करावे. मराठा समाज बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत, पाणी प्यावे. आंदोलकांनी शांततेचा मार्ग सोडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सातारा जिल्ह्यातील चित्रलेखा माने - कदम यांचा भाजपामध्ये प्रवेश

Tue Oct 31 , 2023
मुंबई :- सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या चित्रलेखा माने-कदम यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष (मुख्यालय) माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे आदी उपस्थित होते. यावेळी बावनकुळे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com