1 व 2 जूनला रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार

– शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

– सोहळ्यानिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

– आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि. १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

सोहळ्यानिमित्त राज्यात वर्षभर विविध कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच सांस्कृतिक कार्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय अध्ययन केंद्र, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मिती, राज्यात अकृषिक विद्यापीठस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, तज्ज्ञ समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित साहित्य आणि संदर्भ साहित्याचे डिजिटायझेशन हे उपक्रम प्रस्तावित केले आहेत.

रायगडावर होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन इतिहासाचे साक्षीदार होण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी. गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले.

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री भरत गोगावले, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्यासह शिवराज्याभिषेक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य विभागाने प्रस्तावित केल्यानुसार भारतातील विविध राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी किंवा मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत देशभरात २० अभ्यास केंद्रे निवडली जाणार आहेत. त्यासाठी दिल्ली, दमण दिव, तंजावर, अंदमान, बेळगाव, बडोदा, श्रीशैलम, उदयपूर, भोपाळ, दार्जिलिंग, अहमदाबाद, गुवाहाटी, कोलकाता, पानिपत, भुवनेश्वर, लडाख, विजयपुरा, पाटणा, अमृतसर, पणजी ही ठिकाणे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.

शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष होऊन त्या घटनेचे महत्व आजही तितकेच आहे. तमाम मराठी जनांसाठी ही महत्वाची घटना आहे. यावर्षी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा असल्याने त्याचे आयोजन राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी करावी. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

सोहळ्यानिमित्त रायगडावर रोषणाई करण्यात येणार त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाशी समन्वय ठेवावा कुठलीही अडचण येता कामा नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सोहळ्याच्या दिवशी शिभक्तांसाठी मोफत बससेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सोहळ्याच्या समग्र नियोजनासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गडावर संबंधित लोकप्रतिनीधी, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हा प्रशासनाने नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी गतिमान करावी महसूल - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

Sat Apr 29 , 2023
महसूल मंत्र्यांचा जिल्हाधिकारी-अप्पर जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद              मुंबई :- सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी राज्यातील जिल्हा प्रशासनाने करावी., असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी आज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!