– विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन स्थगित
नागपूर :- राज्यमंडळाच्या “त्या” निर्णयाविरोधात नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्त्वात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने पुकारण्यात आले धरणे / निदर्शने आंदोलन तसेच दहावी / बारावी परीक्षेवर बहिष्कार आंदोलन मागणी मान्य केल्याने स्थगित करण्यात आले आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्यमंडळ) यावर्षीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांना (आस्थापनाव्यतिरिक्त) अन्य शाळांमध्ये केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करावे यासाठीचा निर्णय घेण्यात आलेला होता. सदर निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली नागपूर / अमरावती विभागीय बोर्ड कार्यालयासमोर १ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत धरणे / निदर्शने आंदोलन पुकारण्यात आले होते. सोबतच आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्यातील शिक्षकांवर अविश्वास दर्शविणारा सदर निर्णय रद्द न झाल्यास ११ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या बारावी व २१ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या इयत्ता दहावी परिक्षेदरम्यान बहिष्कार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्यमंडळाला दिला होता. त्यामुळे राज्यमंडळाने २९ जानेवारी २०२५ रोजी पत्रक काढून निर्णयात बदल करण्यात आला. यामुळे शिक्षकांना मूळ आस्थापना सोडून अन्य केंद्रावर जाण्यापासून दिलासा मिळाला आहे. आंदोलनातील प्रमुख मागणी मान्य करण्यात आल्याने सदर धरणे / बहिष्कार आंदोलन स्थगित करण्यात आले.
नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व समविचारी शिक्षक संघटना आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. शेवटी, राज्यमंडळाने शिक्षक संघाच्या मागणीला मान देऊन या निर्णयात बदल केल्याने शिक्षकांच्या एकजुटीच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे.