– आरोग्य सेवा पुरविण्यास प्रशासनाचा पुढाकार
– भरारी पथकाने दिले मोलाचे योगदान
नागपूर :- जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील मेळघाट भागावरील बालमृत्यू आणि मातामृत्यूचा डाग दशकभरानंतर प्रशासनाच्या शर्तीच्या प्रयत्नाने हटला आहे. गेल्या कालावधीत जिल्हाप्रशासनाच्या विशेष लक्षामुळे आरोग्य सेवा परिणामकारक राबविण्यात येत आहे. तसेच सेवेवर अंकुश ठेवण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आल्याने आरोग्य सुविधा आणि सेवांच्या दर्जात सुधारणा झाली आहे.
गेल्या दहा वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास करून मेळघाटात ‘मेळघाट मिशन 28’ राबविण्यात आले आहे. यात प्रामुख्याने जिल्हा प्रशासनाच्या मदतीने उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, 11 प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध सुविधा, 7 फिरती आरोग्य पथक, 6 प्राथमिक आरोग्य पथक, 93 उपकेंद्र, 22 भरानी पथकांमार्फत आरोग्य सेवा देण्यात आली. परिणामस्वरूप 2013-14 मध्ये 338 असणारा बालमृत्यू हा सन 2023-24मध्ये 156वर आला आहे, तर दहा वर्षापूर्वी 14वर असणारा मातामृत्यू दर हा 5 आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे उपजत मृत्यू 134 वरून 79वर आणण्यात आले आहे.
मातामृत्यू आणि बालमृत्यू जाणिवपूर्वक कमी करण्यासाठी मेळघाट क्षेत्रात गरोदरमाता, स्तनदा माता, बालकांना स्त्री रोग व बालरोग तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दर 15 दिवसांनी चक्रकार पद्धतीने ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विशेष तपासणी करण्यात येत आहे. अतिजोखमीच्या बालकांची जबाबदारी बालउपचार केंद्र आणि पोषण संवर्धन केंद्रावर सोपविण्यात आली आहे. सन 2024-25 मध्ये ऑक्टोबरअखेर 25 बालउपाचार केंद्रामध्ये 127 बालकांना भरती करण्यात आले, यात 54 मुलांमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. पोषण संवर्धन केंद्रात ऑक्टोबरअखेर 381 बालकांची भरती करण्यात आली, यात 197 बालकांमध्ये सुधारणा झाली आहे.
मातामृत्यू आणि बालमृत्यूला पायबंद घालण्यासाठी 1 जानेवारी 2022 पासून ‘मेळघाट मिशन 28’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रसृतीच्या 28 दिवस अगोदर आणि नवजात अर्भकास 28 दिवस अंगणवाडी सेविका, आशामार्फत दैनिक भेटी देण्यात येते. यामुळे संस्थात्मक प्रसृतीची टक्केवारी 96 पर्यंत पोहोचली आहे. मेळघाटातील अतिसंवेदनशिल गावांमध्ये आरोग्य सेवा पुरविण्यासाठी नवसंजीवनी योजनेंतर्गत धारणी तालुक्यात 12 आणि चिखलदरा तालुक्यात 10 असे 22 भरारी पथके कार्यान्वित आहेत. भरारी पथकात मानसेवी वैद्यकीय अधिकारी अखंडीत सेवा देत आहेत. त्यामुळे माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात भरारी पथके मोलाचे सहकार्य देत आहेत.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबरअखेर 105 शिबीरे प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आयोजित करण्यात आले आहे. यात तज्ज्ञांमार्फत 4300 गरोदर माता, 670 जोखीमग्रस्त माता, 737 स्तनदा माता आणि 6 महिन्यापर्यंतचे सर्व बालके, तसेच कमी वजन असलेले 771 बालकांची तपासणी करण्यात येऊन उपचारात्मक कार्यक्रम राबविण्यात आले. यातील सर्वांना संदर्भ सेवा पुरविण्यात आल्या आहेत.