– उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली सुनावणी
नागपूर :- कळमेश्वर नगरपरिषदेच्या हद्दीतील दुमजली घर पाडण्याच्या दशकभरापासून प्रलंबित तक्रारीची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाने दखल घेतली. आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी तक्रारदार भिमराव राघोजी निकोसे यांच्या तक्रारीचा आढावा घेउन बुधवारी १९ मार्च रोजी त्यावर सुनावणी केली. तक्रारदाराने समाजकंटकांद्वारे दुमजली घर जेसीबी लावून पाडल्याची तक्रार आयोगाकडे केली होती.
यासंदर्भात बुधवारी रवीभवन नागपूर येथे आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली होती. बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी, सावनेर अनिल मस्के, कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मनोज काळबांडे, कळमेश्वरचे नायब तहसीलदार संदीप तडसे, कळमेश्वर-ब्राम्हणी नगर परिषदचे मुख्याधिकारी आकाश सुरडकर आणि तक्रारदार भिमराव निकोसे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोग, मुंबई चे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी भिमराव निकोसे यांच्या तक्रारीचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. या तक्रारीच्या अनुषंगाने ॲड. मेश्राम यांनी यापूर्वी कळमेश्वर येथे घटनास्थळी भेट देवून २२ फेब्रुवारी २०२५ रोजी बैठक घेतली होती व त्या अनुषंगाने ७ मार्च रोजी आदेश देखील निर्गमित केले होते. त्या आदेशाच्या अनुषंगाने कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मनोज काळबांडे, कळमेश्वर-ब्राम्हणी नगर परिषदचे मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांनी आयोगापुढे अहवाल सादर केला.
पोलिस प्रशासनाच्या अहवालानुसार तक्रारदार भिमराव निकोसे यांचे घर तक्रारदार व विरोधक यांच्यातील वादामुळे झाल्याचे दर्शविण्यात आले व त्यासंदर्भात गुन्हा नोंद करुन पंचनामा केल्याचे नमूद केले आहे. तर मुख्याधिकारी यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी अतिवृष्टीने घर पडल्याचे दर्शविले आहे. दोन अहवालातील तफावत लक्षात घेता नमूद तारखेत नगरपरिषद हद्दीत अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या घरांची संपूर्ण माहिती व किती मीमी पाऊस पडला? याची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.
तक्रारदाराचे घर तेथीलच काही जातीयवादी मानसिकतेच्या समाजकंटकांनी खाजगी जेसीबी च्या सहाय्याने जमीनदोस्त केल्याची तक्रार आयोगाकडे केली होती. ह्यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अनील मस्के ह्यांच्या अध्यक्षतेखाली कळमेश्वर तहसीलदार व नगर परिषद मुख्याधिकारी ह्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाद्वारे प्रकरणाची चौकशी करून आवश्यक गुन्हे नोंदवण्याचे व तसा अहवाल आयोगाला सादर करण्याचे निर्देश आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले. ह्याशिवाय तत्कालीन मुख्याधिकारी रामेश्वर पंडागळे ह्यांनी पुढील तारखेला प्रकरणी समक्ष हजर रहावे, असे देखील निर्देश देण्यात आले.