संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. यात 27 ग्रामपंचायत चे सरपंच थेट जनतेच्या मतदानातून निवडले जाणार आहेत.विशेष बाब अशी की 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत याच 27 ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेच्या मतदानातून निवडल्या गेले होते.आता पुन्हा एकदा जनतेतून सरपंच निवडणूक धोरण जाहीर झाले आणि पुन्हा त्याच ग्रामपंचायत मध्ये थेट जनतेच्या मतदानातून सरपंच निवडले जाणार आहेत. मागील पंचवार्षिक पूर्वी जनतेतून निवडून दिलेल्या सरपंचाना कुठे स्वतःसाठी तर कुठे स्वतःच्या समर्थीत असलेल्या उमेदवारासाठी जाण्याची संधी आहे.याला अजब योगायोग समजल्या जात आहे.
मागील पंचवार्षिक कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. यात कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.ज्यामध्ये येरखेडा,रणाळा,बिना भिलगाव,खैरी,खसाळा,सुरादेवी,खापा, कढोली,भोवरी,आजनी, लिहिगाव,गादा,कापसी बु .सोनेगाव,गुमथी,आवंढी,गुमथळा, तरोडी बु,परसाड,जाखेगाव, केम ,दिघोरी ,आडका,शिवणी,भोवरी व वडोदा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 28 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे.उद्या 2 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 5 डिसेंबर ला छाननी,तर 7 डिसेंबर ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख तर 18 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून 20 डिसेंबर ला निकाल जाहीर केला जाणार आहे.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य असे कीं मागील 2017 मध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांना आपण केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा जनतेसमोर जाण्याची संधी मिळाली आहे.थेट जनतेतून सरपंच झाल्याचा गावाला काय फायदा झाला व सरपंच किती यशस्वी झाले याची पावती मतदार निवडणुकीद्वारे देणार आहेत.एकंदरीत कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीचे निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्याने या गावात निवडणुकीचे वातावरण तापत आहे.थेट जनतेच्या मतदानातून सरपंच निवडल्या जाणार असल्याने या 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.या 27 गावात 34 हजार 674 पुरुष व 33 हजार 509महिला व 2 इतर असे एकूण 68 हजार 185 मतदार मतदान करणार आहेत.हे मतदार थेट सरपंचांना व ग्रामपंचायत सदस्यांना एकाच वेळी मतदान करणार आहेत आता हे मतदार मागील सरपंचांना वा त्यांचे समर्थीत उमेदवारांना मागील सरपंचाच्या कामाच्या अनुभवावरून किती संधी देतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.