– संत सेवालाल महाराजांचे दर्शन घेूवन वाशिम जिल्ह्यातील प्रचाराचा शुभारंभ
वाशिम/ यवतमाळ :- बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरागडच्या या भूमितून संत सेवालाल महाराजांनी समतेची, शौर्याची शिकवण दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शक्तीशाली राष्ट्रनिर्माणात पोहरागडची भूमिका निर्णायक ठरणार आहे, असे प्रतिपादन यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील-महल्ले यांनी केले.
वाशिम जिल्ह्यातील प्रचाराचा शुभारंभ राजश्री हेमंत पाटील-महल्ले यांनी आज सोमवारी पोहरादेवी येथे माता जगदंबा देवी, संत श्री सेवालाल महाराज, संत श्री रामराव महाराज (बापू) यांचे आशीर्वाद घेवून केला. यावेळी यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, खा. हेमंत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ना. संजय राठोड यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या सभेत राजश्री पाटील यांनी, यवतमाळ-वाशिम लोकसभेचा विकास हाच भाजप, शिवसेना महायुतीचा निर्धार असल्याचे सांगितले. ना. संजय राठोड यांनी पोहरादेवीला जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. भारतातील महत्वाचे तीर्थस्थळ व पर्यटनस्थळ म्हणून पोहरादेवी येथे विकासकामे सुरू आहेत. येथील जागृत देवस्थान आई जगदंबा, संत सेवालाल महाराज आणि रामराव बापू महाराजांच्या आशीर्वादाने यवतमाळ-वाशिमच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. लोकसभेत निवडून आल्यानंतर ना. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात येथील विकासात कोणतीही कसर ठेवणार नाही, अशी ग्वाही यावेळी राजश्री पाटील यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: पोहरादेवीच्या विकासकामांवर लक्ष ठेवून आहेत. देशातील बंजारा समजाबांधवांवर त्यांचे विशेष प्रेम आहे. पंतप्रधान मोदीजींच्या उपस्थितीत भविष्यात पोहरादेवी येथील विकासकामांचे लोकार्पण होणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी बोलताना दिली. महायुतीच्या कार्यकाळात राज्यात यवतमाळ-वाशिम जिल्ह्यात विकासकामांसाठी सर्वाधिक निधी खेचून आणल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले. पोहरादेवी हे भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येत असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या विशेष सहकार्यामुळे पोहरादेवीच्या विकासासाठी शासन सातत्याने निधी देत असून त्यातून जागतिक दर्जाची कामे येथे सुरू असल्याचे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले. जगात भारताला महाशक्ती बनविण्यासाठी महायुतीच्या उमदेवार राजश्री हेमंत पाटील यांना लाकसभेत पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचे आवाहन यावेळी संजय राठोड यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर, युवा नेते ज्ञायक पाटणी, यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, वाशिम जिल्हा परिषद गटनेता उमेश ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील, अशोक चव्हाण, अजय जयस्वाल, भाजपा मानोरा तालुकाध्यक्ष ठाकुरसिंग, भाजपा कारंजा तालुकाध्यक्ष डॉ. राजू पाटील, भाजपा कारंजा शहर अध्यक्ष ललित चांडक, जितेंद्र महाराज तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.