महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील चित्र पाहिले तर राजकीय निष्ठा, विचारसरणी, तत्त्व याला दुय्यम स्थान आल्याचे दिसते. उमेदवारीसाठी सोयीची पक्षांतरे, एकाच घरात दोन पक्ष हे आता नवीन नाही. आमदार होण्याच्या इर्षेपायी विचार दुय्यम ठरलेत. राजकीय पक्षांची उमेदवारी यादी पाहिली तर घराणेशाही मोठ्या प्रमाणात आहे. त्याला कोणताही पक्ष अपवाद नाही. उमेदवारी दिल्यानंतर त्याचे समर्थन करण्यासाठी संबंधित तो किंवा ती पक्षात काम करत असल्याचे सांगितले जाते. या साऱ्यात पक्षासाठी कष्ट उपसणारा सामान्य कार्यकर्ता दुर्लक्षित राहतो. यात मतदारांनाही गृहित धरले जाते. अर्थात या काही प्रमाणात मतदारांनाही दोष दिला पाहिजे. कारण अशा घराणेशाहीच्या प्रतिनिधींना ते संधी देतात. यावेळी राज्यात उमेदवारी याद्यांवर नजर टाकल्यावर हेच चित्र दिसते.
भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात…
इतरांपेक्षा वेगळा पक्ष अशी भाजप आपली नेहमी ओळख सांगतो. मात्र सत्ता मिळवण्यासाठी आता या पक्षातही घराणेशाही मोठ्या प्रमाणात आहे. एखाद्या आमदार किंवा खासदाराचा मुलगा त्या पक्षात वर्षानुवर्षे काम करत असेल तर, त्याला उमेदवारी देणे हा भाग वेगळा. अशा वेळी ही उमेदवारी समर्थनीय ठरते. मात्र अचानक केवळ जिंकण्याच्या क्षमतेच्या (इलेक्टीव्ह मेरीट) नावाखाली संबंधित लोकप्रतिनिधीच्या नात्यातील व्यक्तीला संधी देणे अयोग्य आहे. यातून पक्षात असंतोष वाढतो. भाजपने महाराष्ट्रात उमेदवारी देताना बहुतेक जुन्या आमदारांनाच संधी दिली. फार क्वचित विद्यमान आमदार वगळले. मात्र जेथे वगळले तेथे अनेक ठिकाणी संबंधितांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली. यात अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया, कल्याणमध्ये गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा, जळगाव जिल्ह्यात माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल, चिंचवडमध्ये दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप, श्रीगोंदा मतदारसंघात बबनराव पातपुते यांच्या पत्नी प्रतिभा यांचा समावेश आहे. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व त्यांच्या बंधूंना उमेदवारी मिळाली. इचलकरंजीत आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल हे भाजप उमेदवार आहेत. जवळपास २० जण हे घराणेशाहीशी संबंधित आहेत. थोडक्यात प्रत्येक पाच उमेदवारांमागे एक जण हा यातून आला आहे. त्यामुळे घराणेशाहीरून विरोधकांवर टीका करणाऱ्या भाजपला आता लक्ष्य केले जात आहे.
महायुतीतही तेच..
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या यादीतही हाच प्रकार दिसतो. जवळपास ४५ जणांच्या पहिल्या यादीत अनेक नावे घराणेशाहीशी संबंधित आहेत. पैठणमधून संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास, जोगेश्वरी पूर्वमधून खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा, दर्यापूरमधून आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजीत, सांगली जिल्ह्यातून अनिल बाबर यांच्या मुलाला संधी देण्यात आली. तसेच मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण हे राजापूरमधून उमेदवार आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातही अशी काही उदाहरणे आहे. मात्र या दोन पक्षांनी बंडात साथ देणाऱ्या सर्वांनाच पुन्हा संधी दिल्याने त्यांच्या यादीत विशेष बदल नाहीत. जेथे ज्याचा आमदार तेथे उमेदवार हा निकष असल्याने जवळपास १८० जागा त्यांच्या ठरल्या आहेत. त्यामुळे बदलाला मोठी संधी नाही. तरीही जेथे शक्य आहे तेथे तगडा उमेदवार देण्याच्या प्रयत्नात घराणेशाहीचे प्राबल्य उमेदवारी यादीवरून दिसते.
ठाकरे गटही अपवाद नाही
ठाकरे गटानेही आदित्य ठाकरे यांचे मावसबंधू वरुण सरदेसाई यांना रिंगणात उतरवले आहे. याखेरीज रत्नागिरीत भाजपचे माजी आमदार सुरेंद्रनाथ तथा बाळ माने यांना ज्या दिवशी पक्षात प्रवेश केला त्याच दिवशी उमेदवारी मिळाली. याखेरीज डोंबिवली, सिल्लोड या ठिकाणी बाहेरील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. शरद पवार गटात बारामतीमधून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा आहे. येथे पवार कुटुंबातच लढत होईल असे चित्र आहे. याच कुटुंबात तीन खासदार आहेत. आता आमदारही तेच. नवी मुंबईत नाईक कुटुंबीय दोन वेगळ्या पक्षातून भाग्य आजमावत आहेत. सिंधुदुर्गमधील तीनपैकी दोन मतदारसंघात राणे कुटुंबातील व्यक्ती दोन प्रमुख पक्षांमधून रिंगणात आहेत. घराण्यांची ही यादी लांबतच आहे. काँग्रेसची उमेदवारी यादी अद्याप झालेली नाही. मात्र घोषित उमेदवार पाहता सामान्य कार्यकर्त्याने केवळ जयजयकार करण्यात धन्य मानायचे का, हाच मुद्दा आहे.