राज्यपालांच्या हस्ते ‘अहर्निशं सेवामहे’ च्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन संपन्न 

जनकल्याण समितीचे कार्य निःस्वार्थ सेवेचा परिपाठ: राज्यपाल रमेश बैस

मुंबई :-आपल्या स्थापनेपासून ५० वर्षांच्या काळात आरोग्य, शिक्षण, महिला व बाल कल्याण, रक्तपेढी, वस्ती परिवर्तन योजना यांसह वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये १८८० सेवा प्रकल्प राबविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे कार्य निःस्वार्थ सेवेचा परिपाठ आहे, असे प्रशंसोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी येथे काढले.

रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सव पूर्तीनिमित्त संस्थेच्या ५० वर्षांच्या कार्याची माहिती असलेल्या ‘अहर्निशं सेवामहे’ या ग्रंथाच्या हिंदी अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते मंगळवारी (दि. २) स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

प्रकाशन सोहळ्याला रा.स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भैयाजी जोशी, उद्योजक आनंद राठी, जनकल्याण समिती कोंकण प्रांताचे अध्यक्ष डॉ अजित मराठे, महानगर संघचालक सुरेश भगेरिया, संस्थेचे आश्रयदाते व निमंत्रित उपस्थित होते.   

कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाचा कायदा केल्यामुळे देशात आज अनेक संस्था मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करीत आहेत. मात्र अनेक संस्थांच्या कामात द्विरुक्ती आहे, तर काही संस्था ‘काम कमी, आणि प्रसिद्धी अधिक’ अश्या पद्धतीचे काम करीत असल्याचे नमूद करून कॉर्पोरेट संस्थांनी जनकल्याण समितीच्या सहकार्याने आपले सामाजिक दायित्व प्रकल्प राबवावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

सामाजिक दायित्वा इतकेच वैयक्तिक सामाजिक दायित्व महत्वाचे आहे असे सांगून प्रत्येकाने समाजासाठी आपल्या परीने कार्य केले तर देशातील गरिबी, उपासमारी यांसह अनेक समस्यांवर मात करता येईल असे राज्यपालांनी सांगितले. जनकल्याण समिती स्थापनेची ५० वर्षे पूर्ण करीत आहे त्याच वेळी रा. स्व. संघ देखील आपल्या स्थापनेच्या शतकी वर्षाकडे वाटचाल करीत आहे, असे नमूद करून जनकल्याण संस्थेने आपल्या संकल्पित सेवाभावी कार्याचा आराखडा तयार करावा व अधिकाधिक गरजू लोकांना सेवाकार्याचा लाभ द्यावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

आपण सहा वर्षांचे असल्यापासून रा. स्व. संघाशी जोडलो असल्याचे सांगून गुरुजी गोळवलकर यांना प्रत्यक्ष भेटल्याचे तसेच कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे निर्माते एकनाथ रानडे यांच्यासोबत काम केल्याचे राज्यपालांनी सांगितले.

जनकल्याण समितीचे कार्य ५० वर्षे अव्याहतपणे सुरु आहे याचा अर्थ त्याचा पाया बळकट आहे असे सांगून अनेक सुविधांपासून वंचित असलेल्या देशातील वनवासी, आदिवासी भटक्या विमुक्त जमातींपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे भैय्याजी जोशी यांनी सांगितले.

यावेळी जनकल्याण समिती कोंकण प्रांताचे अध्यक्ष डॉ अजित मराठे यांनी संस्थेच्या विविध सेवा प्रकल्पांची माहिती दिली.संदीप वेलिंग यांनी आभार प्रदर्शन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ‘अर्थ आठवडा’ साजरा

Wed May 3 , 2023
चंद्रपूर : पृथ्वीचे संवर्धन करण्यासाठी स्थानीक पातळीवर पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपाययोजना करण्याच्या शासनाच्या आदेशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेने नुकताच ‘अर्थ आठवडा’ साजरा केला.या आठवड्यात पंचमहाभूते – भूमी (जमीन),जल (पाणी), वायू (हवा),अग्नी (ऊर्जा),आकाश (संवर्धन) या सर्व घटकांचे संवर्धन व महत्व सांगणारे विविध कार्यक्रम घेण्यात आले.     मागील काही वर्षात आपण वातावरणातील गंभीर बदल अनुभवत आहोत.वैश्विक पातळीवर या बदलांना अटकाव करण्यासाठी व आपली पृथ्वी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com