मुंबई :- बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई अग्निशमन दलातील अग्निशामक या पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरू असून निकाल अंतिम टप्प्यावर असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य विलास पोतनीस यांनी या भरती प्रक्रियेबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, ९१० अग्निशामक पदांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यामध्ये सेवा प्रवेश नियमानुसार महिलांसाठी उंचीची मर्यादा १६२ सेंटीमीटर एवढी ठेवण्यात आली होती. यानुसार १६२ सेंटीमीटर व त्यापेक्षा अधिक उंची असलेल्या पात्र एकूण ३३१८ महिला उमेदवारांची पुढील मैदानी भरती प्रक्रिया करण्यात आली.
ही भरती प्रक्रिया १४ फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्ण झाली असून अंतिम निकालाची कार्यवाही सुरू आहे. महिला उमेदवारांच्या उंचीच्या बाबतीत पुढील भरती प्रक्रियेत सुधारणा करण्यात येईल. तसेच मोबाईल ॲप विकसित करून प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.