नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाद्वारे ‘आपली बस’ची विद्यार्थी सवलत पास बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात तीन केंद्रांवर विद्यार्थी सवलत पास प्रक्रिया सुरू झालेली आहे.
परिवहन विभागाद्वारे तीन केंद्रांवर पास बनविण्याची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांना मासीक आणि त्रिमासिक पास काढता येणार आहे. पटवर्धन डेपो येथे सीताबर्डी येथील मनीष मार्केट बिल्डिंगमधील तिस-या माळ्यावर, वाडी ऑक्ट्रॉय नाका नं. १० येथील वाडी डेपोमध्ये आणि वासुदेव नगर मेट्रो स्टेशन जवळील हिंगणा डेपो येथे सवलत पास तयार करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. पटवर्धन डेपो येथे सकाळी ८ वाजतापासून ते रात्री ८ वाजता पर्यंत तर वाडी डेपो आणि हिंगणा डेपो येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पास तयार करता येणार आहे.
विद्यार्थ्यांना सवलत पास तयार करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापकाची सही आणि शाळेचा शिक्का असलेले बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक आहे. पास केंद्रावर अर्जात आवश्यक सर्व माहिती भरून त्यावर पासपोर्ट आकाराचे फोटो लावावे व सोबत बोनाफाईड प्रमाणपत्र जोडावे. विद्यार्थी दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देखील सोबत जोडणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी उपरोक्त तीन डेपो कार्यालयापैकी कोणत्याही कार्यालयात आवश्यक कागदपत्रे घेउन जाउन आपली सवलत पास तयार करून घ्यावी, असे आवाहन मनपा परिवहन विभागाद्वारे करण्यात आले आहे.