मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ‘महिमा गुरु रविदास की’ या संत रविदास महाराज यांच्या जीवनावरील हिंदी व मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे राजभवन मुंबई येथे अनावरण करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते श्री स्वामी सत्यानंदजी महाराज रचित ‘अमृतवाणी’ या पुस्तिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले.
संत रविदास यांनी ‘मन चंगा तो कठौती में गंगा’ या वचनाच्या माध्यमातून मन शुद्ध ठेवण्याचा संदेश दिला आहे. मन पवित्र होण्यासाठी कामना, क्रोध, द्वेष आदी भावनांचा त्याग करावा लागतो असे सांगून संत रविदास यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनकार्याबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती होईल असे राज्यपालांनी सांगितले.
महंत रवींद्र पुरी क्रिएशन, सत्या ऑनलाईन प्रॉडक्शन तसेच आदी अनंत कोटी नमन ट्रस्ट यांनी ‘महिमा गुरु रविदास की’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
सुरुवातीला ‘अमृतवाणी सत्संग’ कथाकार गुरुदेव डॉ राजेंद्र जी महाराज यांनी अमृतवाणी या पुस्तिकेची माहिती देताना रामनामाचे महत्व विशद केले. यावेळी महंत केशव पुरी जी महाराज, चित्रपटाचे दिग्दर्शक पुरुषोत्तम शर्मा, ज्येष्ठ पत्रकार अविक्षित रमण व निर्माते विनीत गर्ग उपस्थित होते. संत रविदास यांच्या जीवनावरील चित्रपटाचे प्रकाशन दिनांक ५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे दिग्दर्शनक पुरुषोत्तम शर्मा यांनी सांगितले.