यवतमाळ :- लवकर लागवड केलेल्या कपाशी सद्या पाते आणि फुलावर आहे. अशा कपाशीवर काही ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनात आले आहे. शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करून या किडींचा वेळीच नायनाट करावा, असा सल्ला सहयोगी संशोधन संचालक डॉ.प्रमोद यादगिरवार यांनी दिला आहे.
गुलाबी बोंड अळी सुरुवातीला पात्या व फुलांवर हल्ला करत असते. ज्या फुलांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव असेल किंवा ज्या फुलात गुलाबी बोंड अळी असेल ती न उमललेल्या गुलाब फुलाच्या कळीसारखा दिसतो. ही अळी सुरुवातीला फुलावर जीवन जगते. पाकळ्या न उमललेले गुलाब फुलासारखे दिसणाऱ्या कपाशीच्या डोमकळ्या झाडापासून अलग करून अळीसकट नष्ट करायला पाहिजे. जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या पुढच्या पिढीना रोखण्यात मदत होईल.
कपाशी साधारणतः ४५ दिवसांचे झालेले असताना किडीचा प्रादुर्भाव व आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात येण्यासाठी किमान दोन कामगंध सापळे प्रति एकरी लावणे गरजेचे आहे. या सापळ्यामध्ये सतत दोन ते तीन दिवस सात पतंगापेक्षा जास्त किडी आढळून आल्यास गुलाबी बोंडअळीचा शिरकाव आपल्या शेतामध्ये झालेला आहे व आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडत आहे, असे समजावे.
गुलाबी बोंडअळींना वेळीच रोखण्यासाठी निंबोळी अर्काची फवारणी करून कपाशी ५५ ते ६० दिवसाची झाल्यावर ट्रायकोग्रामा टोयडीईबॅटरी किंवा टायकोग्रामा चीलोनीस या परोपजीवी कीटकाचे अंडी एकरी ६० हजार याप्रमाणे १५ दिवसाच्या अंतराने शेतात चार वेळा सोडावे. यानंतरही नुकसानीची पातळी ५ टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही ५० मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के ३० मिली किंवा इंडॉक्सकार्ब १५.८ टक्के १० मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
जेथे प्रादुर्भाव १० टक्केच्यावर आहे, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३ टक्के अधिक लॅब्डासायहॅलोथ्रीन ४.६ टक्के ५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ५ टक्के २० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के अॅसीटामिप्रीड ७.७ टक्के १० मिली या पैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मास ट्राप्पिंग करीता कामगंध सापळ्यांचा उपयोग एकरी २ ऐवजी ६ ते ८ नग करावे, असे डॉ.प्रमोद यादगिरवार यांनी कळविले आहे.