आंत्रप्रेनर ऑर्गनायझेशन आपल्या कर्मचाऱ्यांना मेट्रो प्रवासाकरिता प्रेरित करणार
नागपूर :- युवकांमध्ये रोजगार निर्मिती करता जागरूकता निर्माण करणाऱ्या `आंत्रप्रेनर ऑर्गनायझेशन’ या संघटनेच्या नागपूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आज नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत असलेल्या झिरो माईल मेट्रो स्टेशन ते ऐअर पोर्ट मेट्रो स्टेशन दरम्यान या संघटनेच्या सुमारे ३५ पदाधिकाऱ्यांनी प्रवास केला.
उद्योजकांनी उद्योजकांसाठी चालवलेली आंत्रप्रेनर ऑर्गनायझेशन हि जागतिक पातळीवर कार्यरत असलेली एकमेव संघटना आहे. एकूण ५७ देशातील १३,००० पेक्षा जास्त उद्योजकांना हि संघटना सहकार्य करते. नागपुरात या संघटनेचे सुमारे ५० सदस्य असून बुटीबोरी, हिंगणा आणि शहरातील इतर औद्योगिक भागात सुमारे ४,००० व्यक्तींना यांच्या मार्फत रोजगार मिळाला आहे. शिक्षण, बांधकाम, विधी, अभियांत्रिकी अश्या विविध क्षेत्रात या संघटनेचे पदाधिकारी सहभागी आहेत.
आजच्या या दौऱ्याबद्दल बोलताना आंत्रप्रेनर ऑर्गनायझेशनचे वरिष्ठ पदाधिकारी निर्भय संचेती यांनी मेट्रोचा प्रवास सुखकर असल्याचे सांगितले. मेट्रो स्टेशन आणि गाडीत असलेली स्वच्छता हा कळीचा मुद्दा असल्याचे संचेती म्हणाले. आपण आपल्या उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेट्रोने प्रवास करण्याकरिता प्रवृत्त असल्याचे संचेती म्हणाले. मेट्रोने प्रवास केल्यास कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल, असेहि ते म्हणाले.
आपण नागपूर मेट्रोत पहिल्यांदा प्रवास करत असल्याचे उद्योजक पुष्कर मुकेवर आणि मिथिला मुकेवर यांनी सांगितले. आजचा हा प्रवास अतिशय उत्तम झाला आणि नागपुरात दळण वळणाच्या क्षेत्रात इतकी उपयुक्त सोय असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे ते म्हणाले. आजच्या या दौऱ्यादरम्यान आंत्रप्रेनर ऑर्गनायझेशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नागपूर मेट्रो
प्रकल्पाच्या विविध पैलूंबद्दल माहिती देण्यात आली. एकूण प्रकल्पाबाबद्दल तसेच प्रकल्पांतर्गत असलेल्या प्रॉपर्टी डेव्हलपमेंट संकल्पनेसंबंधी त्यांना माहिती दिली.