पछाडलेल्या आघाडीकडे ‘ना झेंडा-ना अजेंडा’
पारशिवनी येथे महाविजय संकल्प मेळावा उत्साहात
रामटेक :-आज मोदी हे जगात नंबर एक असे लोकप्रिय नेते झाले आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. म्हणून देशाला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हवे. त्यामुळे ही निवडणूक मोदीची आहे, ही निवडणूक देशाची आहे, ही निवडणूक महिलांच्या आत्मसन्मानाची आहे, ही निवडणूक जनतेच्या फायद्याचे असलेल्या विकासाची आहे. एकीकडे मोदीच्या द्वेषाने पछाडलेली आघाडी त्यांना पराभूत करण्याचा फास रचत आहे. ना त्यांच्याकडे झेंडा आहे ना अजेंडा आहे. ना त्यांच्याकडे काम करण्याची निती, नियत ना निर्णय घेण्याचे धाडस आहे. तर मोदीकडे देशाच्या विकासाचा, प्रगतीचा आणि जनतेला न्याय देण्याचा अजेंडा आहे. म्हणून मोदीना पुन्हा देशाची चावी देण्यासाठी अबकी बार 400 पार आणि राज्यात अबकी बार 45 पार जागा आपल्याला राज्यात मिळवायच्या आहेत. यात राज्यातील निवडूण येणाऱ्या जागांमध्ये तुमचा रामटेकचा होणारा खासदार राजू पारवे हा नंबर 1 वर असला पाहिजे. तुम्हाला समोरच्या उभ्या असलेल्या उमेदवाराचे डिपॉझीट जप्त करायचे आहे. त्यासाठी राजू पारवे यांच्या धनुष्य बाण असलेल्या चिन्हाचे नंबर एकचे बटन दाबून निवडून देण्याचे आवाहन शिवसेना प्रमुख तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
रामटेक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रामटेक येथे टक्कामोरे सेलिब्रेशन, हॉलमध्ये आयोजित महाविजय संकल्प महायुतीचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार कृपाल तुमाने, रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल, रामटेक लोकसभा निवडणूक क्षेत्राचे महायुतीचे शिवसेना उमेदवार राजू पारवे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष (भाजपा) सुधाकर कोहळे, माजी आमदार आशीष देशमुख, रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव आदि नेत्यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रचार सभेला भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन एकता मंच, रासप तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते, सदस्य तथा पदाधिकारी, बूथ प्रमुख, सुपर वॉरियर, सरपंच, उपसरपंच, नगराध्यक्ष, नगर सेवक-सेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पुढे बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी धाडसी निर्णयांसह मोठ मोठ्या योजना आणल्या. देशाला नवीन संसदेची उभारणी त्यांनी केली. एव्हढच काय तर त्यांनी नव्या संसदेत महिलांच्या आरक्षणाचा सर्वात मोठा निर्णय आल्या पंतप्रधानांनी घेतले. जगात भारताची वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केले. आज आपल्या देशाचा डंका मोदी यांच्यामुळे वाजत आहे, याचा आपल्या सार्थ अभिमान आहे. देशाची यापूर्वी अर्थव्यवस्था 11 क्रमांकावर होती. परंतु, आता पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ही 5 व्या क्रमांकावर आली आहे. यातून देशाची प्रगती दिसून येत आहे. आज जगातील विविध राष्ट्रामंध्ये मोदी यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे, कुणी त्यांना बॉस म्हणतो, कुणी त्यांना सलाम करतो तर कुणी त्यांना वाकून नमस्कार करतो. हे देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
‘धनुष्य बाण रामाचा’ आणि ’राजू पारवे आहे कामाचा’
रामटेक ही प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. राजू पारवे हे काम करणारे व्यक्तीमत्व आहे. म्हणून रामटेक लोकसभा निवडणूकीत महायुतीने शिवसेनेच्या राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. मतदान केंद्रात पहिल्याच क्रमांकावर राजू पारवे यांच्या धनुष्य बाण चिन्हाचे बटन आहे, येणाऱ्या 19 एप्रिल 2024 रोजी सर्व मतदारांनी आवर्जून मतदान करून पारवे यांना निवडून द्यावे. त्यामुळे ‘धनुष्य बाण रामाचा’ आणि ’राजू पारवे आहे कामाचा’ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वांची मने जिंकली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समायोचित मार्गदर्शन केले.
सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात पारशिवनी येथे साई सेलिब्रेशन हॉल, मनसर येथे भक्तिधाम, श्रीराम जानकी मंदिर तसेच रामटेकच्या टक्कामोरे सेलिब्रेशन, हॉलमध्ये महाविजय संकल्प महायुतीचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावे घेण्यात आले. महायुतीच्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहयला मिळाला. सर्व समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. तसेच रामटेक लोकसभा निवडणुकीत राजू पारवेंच्या विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. विविध समाजातील बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.