नागपुर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर तर्फे कन्हान ते कामठी येथील कन्हान नदीवर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या रखडलेल्या कामाबद्दल आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित कार्यकारी अभियंता श्री नरेश बोरकर यांच्या कार्यालयात धडक देऊन संथगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल तीव्र आक्षेप घेत तातडीने या पुलाचे काम पूर्ण करून जनतेला रहदारीस खुला करावा अश्या आशयाचे निवेदन मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे शिष्टमंडळाने सादर केले व या विषयावर चर्चा करण्यात आली.
नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर कन्हान स्थित असलेला जुना ब्रिटिशकालीन पुलाची कालमर्यादा संपून ४० वर्षे लोटली आणि नवीन पुलाच्या निर्माणकार्याला सुरू होऊन ७ वर्षे झाली तरी अद्यापही याचे काम पूर्ण झाले नाही. प्रशासनाचा भोंगळ कारभार, कंत्राटदारांवर अधिकाऱ्यांचा अंकुश नाही, कधी निधी आला नाही चे कारण, तर कधी कंत्राटदार पळाला याचे कारण, तर कधी फाईल मंजूर व्हायच्या प्रतीक्षेत असल्याचे कारण, झेपत नाही तर कश्याला खूप सारे प्रोजेक्ट्स एकाचवेळी हाती घेता, या सगळ्या अर्धवट कामामुळे जनतेची प्रचंड गैरसोय होते याचे भान ठेवून निश्चित कालावधीच्या आत कुठलाही पुल, रस्ता तयार झाला पाहिजे याची जाणीव ठेवा अन्यथा मनसेला याविरोधात आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा सूचक इशारा प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांनी चर्चेवेळी दिला.
कालमर्यादा बाह्य झालेल्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलावर रहदारीचा तसेच जड वाहतुकीचा प्रचंड बोझा वाढलाय, जुन्या पुलाची क्षमता संपलीय, कधीही मोठी दुर्घटना घडू शकते असे मत या निवेदनासाठी पुढाकार घेणारे मनसे जनहित सेलचे जिल्हा अध्यक्ष इकबाल रिझवी यांनी व्यक्त केले.
जवळच्या राज्यातील अनेक भागातून या मार्गाने अनेक नागरिक नागपुरात उपचारांसाठी येत असतात या जुन्या छोट्या पुलावरील व्यस्त ट्रॅफिकमुळे येणाऱ्या अंबुलन्स सुध्दा याठिकाणी अडकून पडतात यामुळे पेशंटला उपचारासाठी विलंब होतो अश्या तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या आहेत यावर तेथील स्थानिक प्रशासनाची व पोलिस विभागाची मदत घेऊन येथील रहदारी नवीन पुल बनेपर्यंत सुरक्षित रित्या होईल अशी व्यवस्था तातडीने करा अशी मागणी चर्चेवेळी मनसेचे शहर अध्यक्ष अजय ढोके व शहर अध्यक्ष विशाल बडगे यांनी केली.
आपल्या मागणी रास्त आहे, काही तांत्रिक बाबीमुळे या पुलाचे कार्य प्रलंबित राहिले असले तरी येणाऱ्या तीन महिन्यात या पूलाचे काम करून जनतेच्या रहदारीसाठी सुरू करू असे आश्वासन यावेळी निवेदन स्वीकारताना कार्यकारी अभियंता श्री नरेश बोरकर यांनी मनसे शिष्टमंडळाला दिले. यावेळी प्रामुख्याने मनसे शहर उपाध्यक्ष रजनीकांत जिचकार, शहर सचिव घनश्याम निखाडे, महिला सेना जिल्हाध्यक्षा सौ. कल्पना चव्हाण, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश इलमे, मनविसे उत्तर विभाग अध्यक्ष मनोज कहाळकर, मोरेश्वर कट्यारमल, विनेश ग्रेगरी, ईजाज शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते