– महाराजा अग्रसेन जयंती सोहळ्याचे आयोजन
नागपूर :- महाराजा अग्रसेन यांनी समाजाला मानवतेची शिकवण दिली. त्यांनी सत्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या मूल्यांचा अवलंब करून समाजात परिवर्तन झाले तर तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले.श्री अग्रसेन मंडळ नागपूरच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात महाराजा श्री अग्रसेन जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ना. नितीन गडकरी बोलत होते.
या कार्यक्रमाला कृष्णकुमार गोयल, दिनेश सराफ, शिवकिशन अग्रवाल, रामानंद अग्रवाल, अनंतकुमार अग्रवाल, संदीप अग्रवाल आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी यांनी सुरुवातीला महाराजा अग्रसेन यांना अभिवादन केले. ते म्हणाले, ‘महाराजा अग्रसेन यांनी ज्या मूल्यांवर समाजाचे मार्गदर्शन केले त्यांचे आज वर्तमान स्थितीत चिंतन करण्याची गरज आहे. समाजात होऊन गेलेल्या महात्म्यांसारखे होण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. ‘थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा… आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा’ या ओळींप्रमाणे आपले आचरण असायला हवे.’ अग्रसेन समाजाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘उद्यमशीलता ही तुमची सर्वांत जमेची बाजू आहे.
उद्योग आणि व्यापाराच्या क्षेत्रात देशात कुठेही गेले तरीही अग्रवाल समाजाचे लोक भेटतात. तुम्ही रोजगार निर्माते आहात. रोजगार निर्मात्यांची संख्या वाढली तरच भारत आत्मनिर्भर होईल. त्यासाठी उद्यमशीलता आवश्यक आहे.’ पैसा कमावणे गुन्हा नाही, पण पैसे कमावल्यावर त्याचा आनंद घ्यायचा असेल तर गरिबांसाठी, शिक्षण, आरोग्य आणि सेवा क्षेत्रासाठी खर्च करा, असे आवाहनही ना. गडकरी यांनी केले.