मुंबई :- जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था आणि दलितांना समान हक्क व समान संधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दलितांवरील अत्याचार थांबणार नाही त्यामुळे हे कृतीमध्ये आणण्यासाठी आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रसरकारला खडेबोल सुनावण्याची आवश्यकता आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.
मोहन भागवत यांनी जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था ही नष्ट केली पाहिजे असे वक्तव्य केले होते त्या वक्तव्याचा समाचार घेताना महेश तपासे यांनी हे केंद्रसरकारला सांगण्याची गरज असल्याचे मत मांडले.
जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था नष्ट करावी म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला. त्यानंतरच्या काळात गणपतराव तपासे यांनी मंदिर प्रवेश कायदा आणून दलितांसाठी मंदिरे उघडी केली असेही महेश तपासे म्हणाले.
मात्र हजारो वर्षांपासून ज्यांना शिक्षणापासून, रोजगारापासून, सामाजिक न्यायहक्कापासून वंचित ठेवण्यात आले त्यांच्या संदर्भात मोदीसरकारच्या काळामध्ये दलितांवरील अत्याचार वाढले याबाबतची नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी महेश तपासे यांनी मांडली.
देशात अट्रोसिटीची ११ टक्के वाढ ही २०१९ ते २०२१ मध्ये झाली आहे. आतापर्यंत सात लाख केसेस दाखल आहेत. अशापध्दतीने दलितांवर अत्याचार होत आहेत त्यामुळे अशी वक्तव्य करण्यापेक्षा यासंदर्भात आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रातील सरकारला सक्त सूचना देण्याची आवश्यकता आहे असाही महेश तपासे यांनी सल्ला दिला आहे.