मनपातर्फे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम ( कंटेनर सर्वे ) सुरु

– ब्रिडींग चेकर्स करणार घरांची तपासणी

चंद्रपूर :- मनपा आरोग्य विभागामार्फत संभाव्य डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविण्यात येत असुन याअंतर्गत आरोग्य चमु शहरातल्या प्रत्येक घरांची तपासणी करणार आहेत.

पावसाळा सुरु होताच डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार होण्यास सुरवात होते. पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात २५ ब्रिडींग चेकर्स, ३५ एएनएम, ७ एमपीडब्लु व १६० आशा वर्कर तसेच स्वच्छता निरीक्षक यांच्याद्वारे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. 

डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करणे आवश्यक आहे. पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे,डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. डेंग्यु डासाची उत्पत्ती टाळणे आवश्यक आहे याकरीता आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा.

डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे , अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु सर्वसामान्यांना या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे याबाबत नागरिकांना वारंवार माहिती देऊन व स्वच्छता विभागाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.         संभाव्य डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधास पुढील काही दिवस महत्वाचे आहेत. आधी ज्या घरांमध्ये रुग्ण आढळले होते ते व संभाव्य दुषित घरे यावर विशेष लक्ष ठेवले जात असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा, राज्यात ठिकठिकाणी भाजपाचे सेवा कार्य

Sat Jul 22 , 2023
मुंबई :- रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्यात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्रदान शिबीर, कृत्रिम अवयवांचे वाटप, पूरग्रस्त कुटुंबांना धान्य वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नागपूर येथे आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर शहर अध्यक्ष जितेंद्र कुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com