नागपूर :- मोमिनपुरा येथील मुस्लीम लायब्ररीला मनपाद्वारे 30 वर्षीय भाडेपट्टयावर कोणतेही शुल्क न आकारता देण्यात आले होते. पण भाडेपट्टयातील अटी व शर्तीचा भंग केल्या प्रकरणी कार्यवाही करुन आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार शुक्रवार (ता. १) रोजी मुस्लीम लायब्ररी संस्थेचे कुलूप तोडून ग्रंथालय व इमारतीसह परिसराचा जागेचा ताबा नागपूर महानगरपालिका ग्रंथालय विभागाला देण्यात आला आहे.
मोमिनपुरा येथील भुखंड क्र. 1, 2 व 3, एकुण 13,400 चौ. फुट जागा मुस्लीम लायब्ररीला सन1928, 1931, 1938 या वर्षी 30 वर्षीय कालावधी करिता भाडेपट्टयावर कोणतेही शुल्क न आकारता देण्यात आले होते. पण सचिव, मुस्लीम लायब्ररी यांनी मुस्लीम लायब्ररी परिसरातील जागा M.L.कॅन्टीन व कर्नल बिर्यानी यांना आर्थिक व्यवहार करुन रेस्टॉरेंट चालविण्याकरिता जागा देवून बांधकाम करु दिले. याद्वारे त्यांनी भाडेपट्टयातील अटी व शर्तीचा भंग केला असल्या कारणाने महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 81 (B) अन्वये कार्यवाही करुन मा. आयुक्त यांचे आदेशान्वये दि.15/09/2022 रोजी पंचनामा करुन एकतर्फी ताबा घेण्यात आला होता. शुक्रवारी मुस्लीम लायब्ररी संस्थेचे कुलूप तोडून ग्रंथालय व इमारतीसह परिसराचा जागेचा ताबा नागपूर महानगरपालिका ग्रंथालय विभागाला देण्यात आला आहे.