-सीसीटीव्ही फुटेज तपासनीत मिळाला धागा
– संत्रा मार्केट परिसरात रचला सापळा
नागपूर :-लोखंडी बाकडावर बॅग पाहून त्याच्या मनात लालसा निर्माण झाली. त्याने बॅग उचलली आणि निघून गेला. प्रवासी परत आला तेव्हा बॅग दिसली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीला अटक केली. शेख रज्जाक (44), रा. लोहरपुरा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
धवल अतकरे असे फिर्यादी प्रवाशाचे नाव आहे. त्यांना आझाद हिंद एक्सप्रेसने पुण्याला जायचे होते. 9 जुलै रोजी ते नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वर आले. गाडीच्या प्रतिक्षेत लोखंडी बाकडावर बसले होते. दरम्यान 2.30 ते 3 वाजेच्या सुमारास गाडी आली. त्यांनी बॅग ठेवली आणि गाडीची खात्री करायला गेले.
दरम्यान त्याच वेळेस आरोपी शेख रज्जाक तेथे आला. बॅग पाहून त्याच्या मनात लालसा निर्माण झाली. बॅग जवळ कोणी नाही असे पाहून त्याने बॅग उचलली आणि निघून गेला. धवल बॅग घेण्यासाठी परतला तेव्हा बॅग नव्हती. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, बॅग दिसली नाही. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या कारवाईत पोलिस हवालदार महेंद्र मानकर, श्रीकांत धोटे, रविकांत इंगळे, अविन गजबे, विनोद खोब्रागडे, चंद्रशेखर मदनकर, राहूल यावले, गिरीश राउत, पंकज बांते, मंगेश तितरमारे यांचा समावेश होता.
अशी झाली अटक
लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये शेख रज्जाक बॅग उचलून नेताना दिसला. पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांनी शेख रज्जाकची माहिती गोळा केली. तो संत्रा मार्केट परिसरात पुन्हा येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला पकडले.
मालक नसल्याने बॅग उचलली
शेख रज्जाक हा चोरी करण्याच्या सवईचा नाही. कुठल्यातरी कारणावरून तनावात असल्याने तो घराबाहेर पडला. रेल्वे स्थानकावर आला. त्याला बॅग दिसली, मनात लालसा निर्माण झाल्यामुळे बॅग चोरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.