-बेडशीट धुण्यासाठी आणि वाळविण्याठीही मशिन
-अजनीत मध्य रेल्वेचा अत्याधुनिक प्रकल्प सुरू
– लाखो रुपयांची बचत
नागपूर :- कपडे धुण्यासाठी आणि धुतलेले कपळे वाळविण्यासाठी मशिनचा वापर केला जातो. यात काही नविन नाही परंतु, कपड्यांची इस्त्री आणि त्याची पध्दतशीर घडी करून पॅकींगसुध्दा यंत्रच करीत असेल तर…हो मध्य रेल्वेचा असा महत्वकांक्षी आणि अत्याधुनिक प्रकल्प (मॅकेनाईज्ड लॉड्री) दिड हजार वर्ग मीटर जागेत अजनी येथे सुरू झाला आहे.
येथे यंत्राच्या माध्यमातून रेल्वे प्रवासात वापरण्यात येणारे बेडशीट, हात रूमाल आणि पिलो कव्हर धूतले जातात. वाळविले जातात, कपड्यांची पध्दतशीर घडी करून पॅकींगही मशिननेच केली जाते.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात प्रवासात वापरण्यात येणारे बेड रोल बिलासपूरला धुण्यासाठी पाठविले जायचे. यावर लाखो रुपये खर्च होता. शिवाय काही त्रुट्या असल्यास तात्काळ दुरूस्ती शक्य नव्हती. या सर्व बाबींचा विचार करता मेकॅनाईज्ड लॉड्रीचा प्रस्ताव नागपूर विभागाने मुख्यालयाला पाठविला होता. काही वर्षापूर्वीच केंद्रिय रेल्वे अर्थसंकल्पात या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. निधीही मंजुर झाला, जागाही निश्चित झाली आणि अलिकडेच प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली आहे.
दिवसाला 4 टन कपडे धुण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. दोन पाळीत या प्लांटमध्ये काम सुरू असते. दिवसाला 4 हजार 500 बेडरोल धुतले जातात. बेडशीट धुण्यासाठी 5 मशिन, वाळविण्यासाठी 2, इस्त्रीसाठी -2, कपड्यांची घडीकरण्यासाठी 2 आणि घडी करून कपड्यांची पॅकींग करण्यासाठी 2 मशिन आहेत. नागपुरातून सुटणार्या काही गाड्यात बेडरोल दिले जातात. एका बेडरोलमध्ये दोन बेडशीट, एक ब्लॅकेट, एक हात रूमाल आणि एक पिलो कव्हर असतो.
स्वत बांधा चालवा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर कंत्राटदाराला 10 वर्षासाठी या प्रकल्पाचे काम दिले आहे. दहा वर्ष झाल्यावर येथील संपूर्ण यंत्र सामग्री रेल्वेची होईल. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या उपराजधानीतील युवकांना रोजगार उपलब्ध होत आहे. शिवाय रेल्वे प्रशासनाचे सतत लक्ष असल्याने गुणवत्ताही चांगली आहे.
पर्यावरणाचे संरक्षण, वीजेची बचत
या प्रकल्पात बॉयलर गरम करण्यासाठी कोळसा किंवा लाकडाचा वापर केला जात नाही तर टाकाउपासून उर्जा निर्माण करून बॉयलर गरम केला जातो. त्यामुळे प्रदूषणालाही आळा बसला असून वीजेची सुध्दा बचत होत आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय 25 टक्के जागेवर वृक्षारोपण करण्यात आले आहे.
@ फाईल फोटो