नागपूर :-भावाच्या अंत्यविधीला जाण्यासाठी त्याने धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. रेल्वेच्या लोखंडी गेटवर हाताची पकड घट्ट बसली नाही. तो चक्क रेल्वे खाली गेला. सुदैवाने जीव वाचला, पण पायाचा पंजा कपला. हा थरार नागपूर रेल्वे स्थानकावर अनेकांच्या डोळयासमोर घडला.
अरुणकुमार (26) असे त्या युवकाचे नाव आहे. तो मुळचा कोयबत्तुरचा आहे. सध्या नागपुरात राहत असून बेंगळुरूच्या एका कंपनीत काम करतो. तो चांगल्या पदावर आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास भावाच्या निधनाची बातमी त्याला मिळाली. तो दुपारच्या सुमारास धावपळीत नागपूर रेल्वे स्थानकावर गेला. पुर्व प्रवेशव्दार अर्थात संत्रामार्केट परिसरातील तिकीट केंद्रातून तिकीट घेतली. दरम्यान बेंगळुरूला जाणारी गाडी फलाट क्रमांक 2 वर लागली होती. गाडी सुटण्याच्या तयारीत असल्याचे उद्घोषण झाले. तो फलाट 2 च्या दिशेने धावत सुटला. फलाटावर पोहोचताच गाडी पुढील प्रवासाला निघाली् होती. धावत्या रेल्वेत चढण्याचा त्याने प्रयत्न केला. रेल्वेच्या लोखंडी गेटवर त्याच्या हाताची पकड सैल असल्याने तो खाली पडला. रेल्वे खाली गेला. अरे धावा…वाचवा…अशी आरडा ओरड झाली. त्याच्या जीवाचे मोजता येणार नाहीत येवढे तुकडे झाले असावेत, असा अंदाज वर्तविण्यात आला. मात्र, देव तारी त्याला कोण मारी या युक्ती प्रमाणे त्याचा जीव वाचला. पण पायाचा पंजा गेला. माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस निलेश बारड घटनास्थळी पोहोचले. जखमीला जवळच्या खाजगी रूग्णालयात दाखल केले. आता तो सुखरुप आहे. मित्र त्याची देखभाल करीत आहे.
@ फाईल फोटो