श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचा आणखी एक स्तुत्य पुढाकार
नागपूर, ता. २० : नेहमी सामाजिक आणि लोककल्याणकारी कार्यात अग्रेसर असलेल्या श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट द्वारे आणखी एक महत्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. देशाचा जाज्वल्य इतिहास देशवासीयांपुढे आणणाऱ्या ‘द काश्मीर फाईल’ चित्रपटाची शहरातील प्रत्येक घटकातील व्यक्तींनी अनुभूती घ्यावी यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांनी मांडलेल्या संकल्पनेने आता लोकचळवळीचे स्वरूप घेतले आहे.
श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून ट्रस्टच्या माध्यमातून २५०० तिकीट निःशुल्क वितरित करण्यात आले. यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. यास नागरिकांना उदंड प्रतिसाद देत इतिहास जाणून घेतला. या कार्यात शहरातील अनेक नागरिकांनी आपले योगदान देण्याची इच्छा प्रदर्शित करून आपणही काही तिकीट इतरांना निःशुल्क देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील तळागाळातील व्यक्ती, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी आदींनाही देशाचा पुढे आलेला इतिहास जाणून घेता यावा यासाठी तिकिटांचे प्रायोजकत्व स्वीकारण्याची लोकचळवळ गतिशील होत आहे.
या कार्यात योगदान देण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या यथाशक्तीने जेवढ्या शक्य असेल तेवढ्या तिकिटांचे प्रायोजकत्व स्वीकारण्याचे आवाहन श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे नेहमी सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेण्यात येतो. मोहगाव झिल्पी येथील श्री सिद्धिविनायकाचे सुंदर मंदिर, ‘सोबत पालकत्व’ प्रकल्प, दीनदयाल थाली, आरोग्य शिबिर, कोरोना काळात भोजन, औषध, दवाखाने याबाबतीत केलेले कार्य. या सर्व कार्यांच्या शृंखलेत आता देशाभिमान बनवणाऱ्या बाबीचा समावेश होणे ही गौरवाची बाब आहे.