– शाळेच्या नुतणीकरण कामाची पाहणी व माजी विद्यार्थ्यांशी संवाद
चंद्रपूर :- चंद्रपुरातील ज्युबिली हायस्कूलने अनेक आदर्श विद्यार्थी घडविले आहेत. या शाळेनेच जगण्याचा मंत्र आणि देशभक्तीचे धडे दिले आहे. ज्युबिली हायस्कूलचा विद्यार्थी हा धनाने नाही तर मनाने मोठा झाला आहे. त्यामुळे या शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
जिल्हा परिषद (मा.शा) ज्युबिली हायस्कूल तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या नुतणीकरणाची पाहणी व माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना पालकमंत्री मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, शाळेचे प्राचार्य नार्मलवार, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपअभियंता प्रकाश अमरशेट्टीवर, जयंत मामीडवार, रामपालसिंग, अजय वैरागडे, अतुल तेलंग, संजय खांडरे, प्रा. हेमंत देशमुख, कृष्णाजी बाम, जगदीश रायठट्टा,काळबांडे, वाघमारे, माहुरे यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वप्रथम अतुल वासुदेव इंगोलेद्वारे लिखित ‘वन प्लस वन इलेव्हन’ या पुस्तकाचे अनावरण झाले, अशी घोषणा करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘आज ज्युबिली हायस्कूलच्या ज्या केमिस्ट्री हॉलमध्ये बसलो आहे तेथे लहानपणीच्या सर्व आठवणी मनात दाटून आल्या. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत मी न.प. महात्मा गांधी शाळेत तर 5 ते 10 पर्यंत मी ज्युबिली हायस्कूलमध्ये शिकलो. तेव्हा शाळेमध्ये गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळत होता. आम्ही ज्या काळात शाळेत शिकत होतो त्यावेळेस मागच्या पटांगणात वृक्षारोपण केले. पर्यावरणाचे धडे या शाळेतच मला मिळाले आणि भविष्यात मी राज्याचा वनमंत्री झालो. त्यातून 50 कोटी वृक्ष लागवड करता आली व महाराष्ट्रामध्ये 2550 चौरस किलोमीटर हरित क्षेत्र वाढविले, याचा मला आनंद आहे.’
आई-वडिलांनंतर दुसरे प्रेम शाळेवर असते. जिल्हा परिषद शाळांना मोठा निधी मी उपलब्ध करून दिला आहे. 1500 शाळांमध्ये ई -लर्निंग सुरू केले आहे. खनिज विकास निधीमधून सर्वाधिक निधी आरोग्य आणि शिक्षणावर खर्च केला जात आहे. अनेक नामवंत विद्यार्थी या शाळेने घडविले असून केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील उत्तम शाळा व्हावी, यासाठी मी नक्कीच प्रयत्न करील, असा शब्दही त्यांनी दिला.
आज आपण ज्या केमिस्ट्री हॉलमध्ये बसलो आहोत ते उत्तम दर्जाचे करावे, मात्र त्याचे डिझाईन बदलवू नका. येथील प्रयोगशाळेत सुधारणा करून ती मोठी आणि उत्तम करावी. पोषण आहारासाठी सुद्धा येथे सोय करावी. 21व्या शतकात संगणकीय लॅब ची आवश्यकता आहे. सामाजिक जीवनात समाजाच्या सेवेसाठी ही संगणकीय लॅब उत्तमातील उत्तम करावी. शाळेच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. आपली शाळा राज्यातील सर्वोत्तम होण्यासाठी मी प्रयत्न करणार, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
प्रास्ताविकात जयंत मामीडवार म्हणाले, ‘पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे या शाळेसाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले. जुन्या विद्यार्थ्यांनी 2018 मध्ये या शाळेची दुर्दशा बघितली आणि ‘माझी शाळा जुबली शाळा’ असा ग्रुप तयार केला. शाळेची दुर्दशा पालकमंत्र्यांच्या कानावर टाकण्यात आली. त्यांनी तात्काळ आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि आज काम पूर्ण होत आहे. या शाळेत सर्वजण मोफत शिकले आहे. शाळेचे वैभव कायम जतन करणे आवश्यक आहे. 2018 मध्ये या शाळेत केवळ पाच विद्यार्थी होते आता ही संख्या 267 वर पोहोचली आहे. शाळेची विद्यार्थी क्षमता 1200 विद्यार्थ्यांची असून येथे गरीब मुले शिकतात. आणि ही शाळा हार्ट ऑफ द सिटी आहे.’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत मामीडवार यांनी केले. संचालन अतुल वैरागडे यांनी तर आभार मोरेश्वर बारसागडे यांनी मानले.
वाचनालय, जीम, स्टेडीयम करीता निधी देणार : ज्युबिली शाळेला उत्तम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक तयार करताना निधीबाबत कंजूशी करू नये. ज्युबिली हायस्कूलसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. 14 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून अत्याधुनिक वाचनालय येथे तयार करण्यात येणार आहे. ई -लायब्ररी पासून सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध होतील. या लायब्ररीमध्ये संदर्भ ग्रंथ, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेचे ज्ञान तसेच जगाच्या कोणत्याही ठिकाणावरून विद्यार्थ्यांना येथे शिकता येईल, अशा सुविधा निर्माण केल्या जातील. शाळेतील मोकळ्या जागेत हॉकी व इतर खेळांसाठी चांगले मैदान तयार करावे. वीज बिल शून्य येण्यासाठी संपूर्ण शाळा आणि परिसर सोलरवर करावा. सर्व खोल्यांमध्ये ई -लर्निंग व्यवस्था करावी. या शाळेतील सर्व फर्निचर नवीन करावे. अत्याधुनिक जीमसाठी 3 कोटी रुपये चा निधी देण्यात येईल. या शाळेची विहीर, जलकुंभ याची त्वरित दुरुस्त करावी व चांगली आर.ओ मशीन येथे लावावी, अशी सूचना ना.मुनगंटीवार यांनी दिली.
माजी विद्यार्थ्यांची समिती होणार : सर्वांच्या योगदानाने या शाळेला गतवैभव प्राप्त होणार आहे. शाळेच्या योग्य देखरेखीसाठी तसेच सूचनांसाठी 10-12 माजी विद्यार्थ्यांची एक समिती करणे आवश्यक आहे. दूरवरच्या माजी विद्यार्थ्यांसाठी पोर्टल तयार करावे व त्या पोर्टलवर सर्वांची नोंदणी करावी. तसेच सर्वांची यादी तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
शाळेच्या नुतणीकरणांतर्गत झालेली कामे : 10 वर्ग खोल्या, 2 स्टाफ रूम, प्राचार्य कक्ष, वाचनालय, संगणक कक्ष एनसीसी कक्ष, संगीत कक्ष, जिम कक्ष, संचालक मंडळ कक्ष, लेक्चर हॉल, केमिस्ट्री लॅब यातील दरवाजे खिडक्यांची दुरुस्ती, फरशी बदलविणे, छप्पर बदलविणे, बाह्य व अंतर्गत प्लास्टर करणे, ऍकॉस्टिक सिलिंग करणे, स्टील रेलिंग करणे ही कामे पूर्ण झाली आहेत. तर 24 कॅरेट लक्झरी पेंट करणे, टेक्सचर पेंट करणे, मुला-मुलींकरीता नवीन शौचालय बांधणे, पोषण आहार करीता किचनचे बांधकाम करणे ही कामे प्रगतीपथावर आहे. तसेच विद्यु विद्युतीकरणाच्या कामामध्ये संपूर्ण कन्सिल वायरिंग, एलईडी लाइट्स, एनर्जी सेविंग सिलिंग फॅन, वायरिंग, प्रत्येक वर्गखोली पॅसेज व परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा, बाह्य परिसरात प्रकाश योजना करण्यात येत आहे.