नागपूर :- राज्यातील जिल्हा परिषदेत कार्यरत असणाऱ्या समाज कल्याण विभागाचे विभाग प्रमुख जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. शासनाने नुकतेच यासंबंधी आयुक्तालयास तरतूद उपलब्ध करून दिले असून आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नुकतेच यासंबंधी निधी वाटपाचे आदेश निर्गमित केले असून 55 लाख या अधिकाऱ्यांच्या वेतनासाठी वितरित केली आहे.
समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांसह मागासवर्गीयांसाठीच्या विविध योजना ग्रामीण भागात राबविण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांची महत्त्वाची भूमिका असून त्यांचा वेतन प्रश्न उपस्थित झाला होता. शासनाकडून यासंदर्भात तरतूद प्राप्त होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या संदर्भात या सर्व अधिकाऱ्यांनी समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला होता. आयुक्त यांनी या विषयासंदर्भात शासनाची तात्काळ पाठपुरावा करून निधी प्राप्त करून घेतला आहे त्यामुळे या सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागले असल्याने या सर्व अधिकाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
पुणे, नागपूर, हिंगोली, उस्मानाबाद, नाशिक, नंदुरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, जालना, बीड व लातूर येथे कार्यरत असणाऱ्या 16 जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचा हा प्रश्न निर्माण झाला होता. आता या सर्वांचे वेतन वेळेवर होणार असल्याने त्यांनी शासनाचे आभार मानले आहे.