“आशाताई” या आरोग्ययंत्रणेचा महत्त्वाचा कणा – डॉ. अभिजीत चौधरी

– मनपातर्फे सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकांना पुरस्कार प्रदान

नागपूर :- आशा स्वयंसेविका या “आशाताई” म्हणून घराघरातील कुटुंबाचा भाग झाल्या आहेत. नागरिक, शासन-प्रशासन स्तरावरही आशा स्वयंसेविकांना “आशाताई” म्हणूनच संबोधले जाते. नागरिकांचा विश्वास त्यांच्यावर आहे, याच विश्वासाच्या जोरावर “आशाताई” आज आपल्या आरोग्य यंत्रणेचा महत्त्वाचा कणा बनल्या आहेत. असे प्रतिपादन नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

मनपा आयुक्त गुरुवारी (ता २०) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार सोहळ्यात मार्गदर्शनपर बोलत होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी अध्यक्षस्थानी असलेल्या कार्यक्रमात आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, मनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी द्वय डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड, हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठपती, शहर क्षयरोग अधिकारी, डॉ. शिल्पा जिचकार, साथरोग अधिकारी गोवर्धन नवखरे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक खान यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी व शेकडोंच्या संख्येत आशा स्वयं सेविका उपस्थित होत्या.

कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मनपा कार्यक्षत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत आशा स्वयंसेविका यांचा पुरस्कार, प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. मनपा शहरी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशीनगर झोन अंतर्गत कपिल नगर युपीएचसी येथील  यजुकला संजय गजभिये यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते २५ हजार रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर द्वितीय पुरस्कार धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या बाबुलखेडा युपीएचसी येथील संगीता नितीन वानखेडे यांना प्रदान करण्यात आला. संगीता वानखेडे यांचा मान्यवरांच्या हस्ते १५ हजार रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तृतीय पुरस्कार धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या फुटाळा युपीएचसी येथील सारिका दिनेश झाडे यांना प्रदान करण्यात आला. सारिका झाले यांना मान्यवरांच्या हस्ते ५ हजार रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करायला हवे, यामुळे इतरांना उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळते. युपीएससी स्तरावर अशाच प्रकारचे पुरस्कार देण्याचा मानस मनपाचा असल्याचेही डॉ. चौधरी म्हणाले, याशिवाय सध्याचे जग हे तंत्रज्ञानचे असून, आशाताईंनी देखील स्वतःला अपडेट करून तंत्रस्नेही व्हायला हवे, पुढेचालून आरोग्य यंत्रणेचे संपूर्ण काम हे ऑनलाईन होणार असल्याचेही डॉ. चौधरी यावेळी म्हणाले.

तर उपसंचालक डॉ. कांचन वानेरे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा याकरिता आशा स्वयंसेविकांनी योजनांच्या जनजागृतीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत डॉ. दीपक सेलोकर यांनी आशा स्वयंसेविकांनी माता व अर्भक मृत्यू दर काम करण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन केले. याशिवाय मनपातर्फे लवकरच आशा सेविकांना टँबलेटचे वितरण करण्यात येणार असल्याचे ही डॉ. सेलोकर यांनी सांगितले. कार्यक्रमात सर्वप्रथम डॉ. सरला लाड यांनी आपल्या संगणकीय सादारीकरणाद्वारे “आशांचे काम आणि मोबदला” याबाबत माहिती दिली. तर डॉ. अतिक खान यांनी आभार व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शाळा व महाविद्यालयात राज्य गीत लावण्याची प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंटची मागणी

Fri Jun 21 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील शाळा व महाविद्यालयात महाराष्ट्राचे राज्य गीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’लावण्यात यावा तसेच यात कसूर करणाऱ्या अधिकारी व शिक्षण संस्थेवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आक्रमक आंदोलन करेल असा ईशारा पदाधिकाऱ्याकडून प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आला आहे. दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला महाराष्ट् […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com