– नासवीने आयोजित केली टी व्ही सी सदस्यांची बैठक
मुंबई :- दिनांक २७ जून, २०२३ रोजी नासवी आणि अमेरिकन इंडिया फाऊंडेशन या संस्थांनी मिळून सी. डी. बर्फीवाला सभागृह, अंधेरी येथे सर्व नगर पथविक्रेता समिती (टी.व्ही.सी) सदस्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. सध्या मुंबई महानगरपालिका नगर पथविक्रेता समिती सदस्यांच्या निवडणुकीची तयारी करीत असून त्यासाठी फेरीवाल्यांची मतदार यादीसुद्धा संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. मुंबईतील ९९,४३५ सर्वेक्षित फेरीवाल्यांपैकी केवळ ३२ हजार पात्र फेरीवाल्यांना मतदानाचा हक्क दिल्याने फेरीवाल्यांनी त्यास विरोध दर्शविला होता. तसेच अजूनही वेळ गेलेली नसून सर्वेक्षित ९९,४३५ फेरीवाल्यांचा मतदार म्हणून विचार करावा असेही काही सदस्यांचे म्हणणे आहे.
नगर पथविक्रेता समितीच्या या निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिका निर्वाचित सदस्यांसहीत नगर पथविक्रेता समितीची स्थापना करणार असून या नगर पथविक्रेता समितीमध्ये मुंबईसाठी नव्याने फेरीवाला धोरण तयार केले जाईल तसेच समितीच्या स्थापनेनंतर फेरीवाल्यांचे नव्याने सर्वेक्षण होणे अपेक्षित असल्याने सध्या सर्व फेरीवाल्यांचे प्रतिनिधी निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. त्याचधर्तीवर नासवी आणि अमेरिकन इंडिया फाऊंडेशन या संस्थांनी हि बैठक बोलावली होती.
या बैठकीमध्ये निर्वाचित नगर पथविक्रेता समितीचे महत्व, निवडणुकीची रणनीती, नियोजन इत्यादी मुद्द्यावर चर्चा झाली असून आझाद हॉकर्स युनियनचे दयाशंकर सिंग, जनवादी हॉकर्स युनियनचे के नारायण, लोहिया विचारमंचचे रामबाबू गुप्ता, पुण्याचे दीपक मोहिते आणि नासवी संस्थेचे गुरुनाथ सावंत यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली होती.